जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात बोलू लागतात..., पुण्यातील ‘शिवसृष्टीत’ अनोखी अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:58 PM2023-02-15T17:58:00+5:302023-02-15T17:58:08+5:30

'शिवसृष्टी’ हे अशियातील सर्वात भव्य असे ऐतिहासिक थीम पार्क

When Chhatrapati Shivaji Maharaj actually starts talking Shiva Srishti in Pune will get a unique experience | जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात बोलू लागतात..., पुण्यातील ‘शिवसृष्टीत’ अनोखी अनुभूती

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात बोलू लागतात..., पुण्यातील ‘शिवसृष्टीत’ अनोखी अनुभूती

googlenewsNext

पुणे : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा द्रष्टा राजा, युद्धाभ्यास आणि राजनितीमधील ‘चाणक्य’ अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती आजवर शिवचरित्रातून वाचली असेल किंवा इतिहास अभ्यासकांच्या विचारांमधून ऐकायला मिळाली असेल. पण कल्पना करा, प्रत्यक्षात जर शिवाजी महाराज बोलू लागले तर! न-हे आंबेगाव येथे साकारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये हा अनुभव शिवप्रेमींना मिळणार आहे. ’मँड मँपिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिवाजीमहाराजांचा पुतळा बोलका केलायं. याद्वारे जणू साक्षात शिवाजी महाराजच समोर उभे राहून बोलत असल्याचा फिल येतो अन अंगावर रोमांच उभे राहातात.

’अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती महाराजांचा सोळाव्या शतकातील ‘शिवकाळ ’हा ‘शिवसृष्टी’ मधून पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारल्या जाणा-या ‘शिवसृष्टी’ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या शिवजयंतीदिनी (दि.19) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव उपस्थित राहाणार आहेत. त्यानंतर दि. 20 फेब्रृवारीपासून ही शिवसृष्टी सामान्यांसाठी खुली होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वस्त जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त विनीत कुबेर व ‘शिवसृष्टी’चे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

"शिवसृष्टी’ हे अशियातील सर्वात भव्य असे ऐतिहासिक थीम पार्क असून, त्याचा पहिला टप्पा असलेल्या ’सरकारवाडा’ मध्ये भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउददेशीय सभागृह उभारण्यात आले आहे. याशिवाय देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारे ‘दुर्गवैभव’, शिवछत्रपतींच्या काळात वापर असलेल्या शस्त्रांचे ’रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन अशी विविध दालने आणि महाराजांची आग्रा येथून झालेल्या सुटकेची विशेष शो च्या माध्यमातून घडणारी सफर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात भवानी माता स्मारक, राजसभा व डार्क राईड, रंगमंडल तर तिस-या टप्प्यात माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण आदींचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ व अश्वारोहण, लँडस्केप-हार्डस्केप आदी कामे पुढील दोन वर्षांच्या काळात पूर्ण होतील असे कदम यांनी सांगितले.

शिवसृष्टीची वैशिष्ट्ये

- किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिग; होलोग्राफी, अँनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, थ्री डी प्रोजेक्शन, मँपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर
-  या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च 438 कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये देणगीदारांकडून उपलब्ध. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांमधून तसेच जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून जमा केलेल्या निधीचाही सदुपयोग
-  मुख्यमंत्र्यांनी कँबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रकल्पाला केले 50 कोटी रुपये मंजूर.
-  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण 2016 अंतर्गत प्रकल्पाला ‘मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून मान्यता
-  येत्या 20 फेब्रृवारीपासून शिवसृष्टीचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 350 रुपये मोजावे लागणार; आॅनलाइन नोंदणीद्वारेही तिकिट बुक करणे शक्य.

Web Title: When Chhatrapati Shivaji Maharaj actually starts talking Shiva Srishti in Pune will get a unique experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.