बेकायदा गोडाऊनवर कारवाई कधी ?
By admin | Published: May 10, 2017 04:16 AM2017-05-10T04:16:42+5:302017-05-10T04:16:42+5:30
गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्यास महापालिकेचे अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्यास महापालिकेचे अधिकारी फिरकतदेखील नाहीत. अनधिकृत गोडाऊनने रस्त्याचे दोन्ही भाग व्यापले आहेत. मात्र, प्रशासन बेफिकीर आहे. राजकीय नेत्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव असणे व तो दबाव या अधिकाऱ्यांनी सहन करणे हेच या ठिकाणी दिसून येते.
पुणे स्टेशन ते शत्रुंजय मंदिरापर्यंत सातारा रस्त्याला समांतर रस्ता म्हणून हा डी. पी. रस्ता करण्यात आला. मात्र, गंगाधाम ते शत्रुंजय मंदिरापर्यंत या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. दोन आमदार दोन बाजूंनी रस्त्याचे काम करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. मात्र, या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून तातडीने रस्ता मोठा करून घेणे, हे या दोन्ही सत्ताधारी आमदारांना आतापर्यंत तरी जमलेले दिसत नाही. काही ठिकाणी कोर्टाचे वाद आहेत, ते वगळता इतर जागेवरील अतिक्रमणे काढता येणे सहज शक्य आहे. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने आई माता मंदिर ते शांतिनगर सोसायटी चौकापर्यंत अनधिकृत गोडाऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच आतमध्येदेखील बांधण्यात आले आहेत.