महिला पोलीस निरीक्षकांना न्याय कधी?

By admin | Published: May 1, 2016 03:04 AM2016-05-01T03:04:47+5:302016-05-01T03:04:47+5:30

महिला पोलीस निरीक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्या पोलीस ठाण्यांची धुरा सांभाळण्यात कमी पडतील अशी कारणे देत अनेक वर्षांपासून ‘इनचार्जशिप’ करण्यापासू

When did police police inspector judge? | महिला पोलीस निरीक्षकांना न्याय कधी?

महिला पोलीस निरीक्षकांना न्याय कधी?

Next

पुणे : महिला पोलीस निरीक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्या पोलीस ठाण्यांची धुरा सांभाळण्यात कमी पडतील अशी कारणे देत अनेक वर्षांपासून ‘इनचार्जशिप’ करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेल्या महिला अधिकारी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ महिला म्हणून नियुक्त्यांमध्ये होणारा भेदभाव या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारा ठरत आहे. ज्या महिला अधिकाऱ्यांकडे सध्या पोलीस ठाण्यांची धुरा आहे त्यांनी ती समर्थपणे पेलल्याचे चित्र असल्यामुळे त्यांच्याबाबत होणारी टाळाटाळ निदान यावेळी तरी केली जाणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयुक्तालयाला रश्मी शुक्ला यांच्या रूपाने महिला पोलीस आयुक्त लाभल्याने महिला अधिकाऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २0१0 साली अध्यादेश काढून मुंबई आयुक्तालयाकरिता ५, पुणे आणि अन्य आयुक्तालयांकरिता ३ तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकी एका महिला निरीक्षकाला पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नेमण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यानंतर, पुण्यामध्ये लष्कर पोलीस ठाण्याला सुषमा चव्हाण यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हा आदेश बासनात गुंडाळण्यात आला. त्यानंतर तब्बल चार वर्षे महिला निरीक्षकांना पोलीस ठाण्यांची धुरा सांभाळण्यासाठी असमर्थ ठरवण्यात आले. योग्यतेच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला की लिंगभेदाच्या भावनेतून याबाबत संभ्रम आहे. परंतु, काम करू इच्छित असलेल्या महिला अधिकाऱ्यांसाठी हा सर्व प्रकार निराशादायक होता.
मागील वर्षी राज्य शासनाने पुणे पोलिसांना महिला अधिकाऱ्यांना किती पोस्टिंग दिल्या आहेत आणि किती पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकपदी महिला अधिकारी आहेत याची विचारणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी वारजे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी अनुजा देशमाने आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी सीआयडीमधून बदलून आलेल्या रेखा साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली. सध्या दत्तवाडी पोलीस ठाण्याला स्मिता जाधव, कोंढवा पोलीस ठाण्याला वर्षाराणी पाटील, डेक्कन पोलीस ठाण्याला सुचेता खोकले, भोसरी पोलीस ठाण्याला स्वाती थोरात-डुंबरे या गुन्हे निरीक्षक म्हणून काम करीत आहेत. तर गुन्हे शाखेमध्ये सध्या सुषमा चव्हाण, प्रतिभा जोशी, नीलम जाधव, वाहतूक शाखेत क्रांती पवार, नीला उदासिन, विजया कारंडे आणि कल्पना जाधव कार्यरत
आहेत. कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
निर्माण केले जात असल्याची भावना झाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे काटेरी ‘मुकुट’
वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, विस्तारणारी हद्द, मालमत्तेचे गुन्हे आणि एकूणच गुन्ह्यांचे बदलते स्वरूप यामुळे पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपद म्हणजे काटेरी मुकुट झालेला आहे. जिथे पुरुष अधिकारी पोलीस ठाणे ‘कंट्रोल’ करण्यात अपयशी ठरत आहेत; तिथे महिला अधिकारी कशा पुऱ्या पडणार असा एक समज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आहे.
यासोबतच महिला अधिकारी रात्र गस्त आणि रात्रपाळी करू शकतील का, असाही एक स्वर असतो. शहरात सध्या ४0 पोलीस ठाणी कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यांच्या संख्येच्या तुलनेत महिला निरीक्षकांना मिळणाऱ्या नेमणुकांचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक महिला अधिकाऱ्यांमध्ये हिम्मत आहे, काम करण्याची आणि विशेष म्हणजे ‘रिझल्ट’ देण्याची इच्छा आहे. मात्र, झारीतील शुक्राचार्यांमुळे त्यांना कर्तृत्व दाखवण्याची संधीच मिळत नाही.

पुण्याला रश्मी शुक्ला यांच्या रूपाने दुसऱ्या महिला आयुक्त लाभल्या आहेत. यासोबतच नुकत्याच कल्पना बारवकर यांनी परिमंडल चारच्या उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. यासोबतच खडकी विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, चतु:शृंगीच्या वैशाली जाधव माने आणि वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त कविता नेरकर या महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत.

नुकतीच आयुक्तांनी पोलीस मुख्यालयामध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी लेखू नका. आपण समान पगार घेतो तर जबाबदारीही समान स्वीकारली पाहिजे असे सांगितले होते. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या अंतर्गत बदल्यांमध्ये पदरी काय पडते याची प्रतीक्षा महिला अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे.

Web Title: When did police police inspector judge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.