चिंचवड-रोहा रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?
By admin | Published: June 10, 2017 02:11 AM2017-06-10T02:11:50+5:302017-06-10T02:11:50+5:30
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी चिंचवड ते रोहा हा लोहमार्ग प्रस्तावित आहे. सर्वेक्षणही झाले आहे. मात्र, केंद्र, राज्य
विश्वास मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी चिंचवड ते रोहा हा लोहमार्ग प्रस्तावित आहे. सर्वेक्षणही झाले आहे. मात्र, केंद्र, राज्य आणि रेल्वे विभागाने निधीचा हिस्सा कोणी किती उचलायचा याबाबत एकमत आणि ठोस निर्णय होत नसल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. कोकणवासीयांची वाट सुकर करणाऱ्या लोहमार्ग आर्थिक विवंचनेत आहे.
केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यातील प्रश्नांकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. पुणे-नाशिक आणि चिंचवड- रोहा हे रेल्वेमार्ग तयार करण्यासंदर्भात सुमारे वीस वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते. रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी असताना त्यांनी या मार्गाचे सर्वेक्षणही केले होते. मात्र, पुढे या मार्गाला गती न मिळाल्याने हे दोन मार्ग कागदावरच होते. तसेच पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी संघटनांनीही याविषयावर आवाज उठविला होता.
लोकमतने याविषयी आता बास या उपक्रमांतून हा प्रश्न किती गंभीर आहे, हे वृत्तमालिकेच्या माध्यमातून मांडले होते. रेल्वेच्या प्रश्नांवर आवाज उठविला होता. त्यानंतर मावळच्या खासदारपदी श्रीरंग बारणे निवडणूक आल्यानंतर ‘लोकमत’च्या मालिकेचा आधार घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
1हिंजवडी-पुणे ही मेट्रो करण्यास चालना दिली गेली़ मात्र, चिंचवड-रोहा मार्गाबाबत राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेचारशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एकूण खर्चापैकी रेल्वे, राज्य शासन किती हिस्सा उचलणार याबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास गती मिळालेली नाही. पुणे-मुंबई लोहमार्गावरील चिंचवड जंक्शन येथून हिंजवडीतून पुढे रोह्याकडे मार्गस्थ होणार आहे.
2 सध्या हिंजवडीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. हा नवा मार्ग सुरू झाल्यास वाहतूककोंडीवर नियंत्रण आणता येणार आहे. तसेच हिंजवडीतील लाखो अभियंत्यांचा प्रवास सुकर होणार आहे. या मार्गामुळे हिंजवडीकरांना रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास पुणे किंवा चिंचवड स्टेशनला यावे लागत होते. मात्र, रोहामार्गामुळे हिंजवडीही रेल्वेला जोडली जाणार आहे. त्यामुळे आयटीयन्सना प्रवास सुकर होणार आहे.
दोन वेळा सर्वेक्षण
४खासदार कलमाडी मंत्री असताना त्यांनी चिंचवड रोहा मार्गाचे सर्वेक्षण करवून घेतले होते. त्यानंतर २००७-२००८ या कालखंडातही सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून त्यापुढील मार्ग भूसंपादन, त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सर्वेक्षण होऊन त्यावर कोणतीही प्रगती झालेली नाही. हा प्रस्ताव कागदावरच होता.