‘चंपा’चे बारसे नेमके झाले कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:21+5:302020-11-26T04:27:21+5:30
पुणे : शालजोडीतले लगावणे, फटकळपणाकडे झुकणारा स्पष्टवक्तेपणा, उपहास, अनुल्लेखाने मारणे, पुरते जोखून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल कौतुकाचे चार शब्द न काढणे ...
पुणे : शालजोडीतले लगावणे, फटकळपणाकडे झुकणारा स्पष्टवक्तेपणा, उपहास, अनुल्लेखाने मारणे, पुरते जोखून घेतल्याशिवाय एखाद्याबद्दल कौतुकाचे चार शब्द न काढणे या सगळ्यांच्या अजब मिश्रणातून अस्सल ‘पुणेरी’ बोलणं जन्माला आल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर सध्या गाजत असलेल्या ‘चंपा’चे बारसे नेमके झाले कधी, याची खमंग चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात ‘चंपा’वरुन खडाजंगी रंगली आहे. या ‘चंपा’चा जन्म कोठे झाला याबद्दल मात्र एकमत होताना दिसत नाही.
चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापुरचे असून पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व त्यांनी केलेले आहे. सन २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पाटील यांनी कोल्हापुरऐवजी कोथरूड मतदार संघाची निवड केली. या निवडणुकीच्या प्रचाराने ‘चंपा’ हे नाव खऱ्या अर्थाने सर्वदूर पोहोचवले. या निवडणुकीत मंडईत मनसेच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत कार्यकर्त्यांनी ‘चंपा’विषयी बोला, असा आग्रह राज यांच्याकडे धरला. त्यावेळी राज यांनी चंपा म्हणजे काय रे, असा उलट प्रश्न केला. त्यावेळी ‘चंद्रकांत पाटील’ असा खुलासा त्यांच्यापुढे भर सभेतच करण्यात आला. त्यानंतर ‘चंपा’ हा शब्दप्रयोग सार्वजनिक झाला.
आता विरोधी पक्षातल्या तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येही हा शब्दप्रयोग सर्रास केला जात असल्याचे पाहायला मिळते. अर्थात यामागे हेटाळणीचाच सूर असतो, असे मात्र अजिबातच नाही. नाव आणि आडनावाचे ‘लघुरूप’ वापरण्याची परंपरा पुण्याची आहेच, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाला देखील पुणेकर ‘पुल’ म्हणून आदराने संबोधतात, असा प्रतिप्रश्न काहींनी केला.
सध्याच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘चंपा’ची चर्चा ऐरणीवर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडून या शब्दप्रयोगाचे समर्थन जाहीरपणे करण्यात आले. प्रामुख्याने झाला. राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मते ‘चंपा’ हे बारसे चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर झाले.
चौकट
जयंत पाटील यांना टोला
‘तुम्ही वाईट वाटून घेऊ नये,’ असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मग तुम्हाला शरद पवारांना ‘शप’ म्हणायचे का, उद्धव ठाकरेंना ‘उठा’ म्हणायचे का,” असा प्रश्न पाटील यांनी केला. “वागावं कसं, बोलावं कसं याचे मार्गदर्शन अन्य राज्ये महाराष्ट्राकडून घेतात. पण एखाद्याच्या शरीरयष्टीवर बोलायचं, तो दिसतो कसा, त्याचे नाव काय, आडनाव काय यावरच बोलायचं का, तुम्हाला महाराष्ट्रात ही संस्कृती आणायची का,” असा प्रश्न पाटील यांनी केला.