गांधीजींच्या शस्त्रक्रियेत लाईट गेली तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:25 AM2018-10-02T11:25:25+5:302018-10-02T11:25:47+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया.
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती 150 वी जयंती. त्यांच्या अनेक आठवणी आज जागवल्या जात आहे. त्यापैकीच एक आठवण म्हणजे पुण्यातील ससून रुग्णालायत त्यांची झालेली शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया जरी लहान असली तरी त्यात अचानक लाईट गेल्याने गोंधळ उडाला होता. या प्रसंगाला आता 94 वर्ष पूर्ण झाली आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत लाखो रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यामध्ये खुद्द गांधीजींचाही समावेश आहे.
गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 मार्च 1922 अहमदाबाद न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले. येरवड्यात 22 महिने पूर्ण झाल्यावर त्यांना पोटाच्या आतड्यात (ऍपेंडिक्स) वेदना होण्यास सुरुवात झाली. अखेर 12 जानेवारी 1924च्या रात्री त्यांची शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातही अचानक वीज खंडित झाली होती. त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. ससूनच्या जुन्या दगडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयाच्या वतीने ऑपरेशन झाले त्या ठिकाणी छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे. गांधीजींवर शस्त्रक्रिया करतानाची सामुग्री जपून ठेवण्यात आली. इतर वेळी हे स्मारक सर्वांसाठी खुले नसले तरी त्यांच्या जयंतीनिमित्त सामान्यांकरिता खुले करण्यात येते.