Pune ZP | जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट-गणांची प्रसिद्धी कधी; इच्छुकांमध्ये उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:19 AM2022-03-02T10:19:24+5:302022-03-02T10:21:54+5:30
अद्यापही निवडणूक आयोगाकडून प्रारूप रचना जाहीर केली नाही....
पुणे : शासनाच्या नवीन नियमानुसार वाढीव संख्येनुसार पुणेजिल्हा परिषदेची प्रारूप गट-गण रचना तयार करून १२ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. प्रारूप गट-गण रचना सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही निवडणूक आयोगाकडून प्रारूप रचना जाहीर केली नाही. यामुळे आता आयोग ही प्रारूप गट-गण रचना कधी जाहीर करणार, अंतिम गट-गण कधीपर्यंत होणार, आरक्षणाचे काय, याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना प्रारूप गट-गण रचना सादर करण्याची मुदत दिली होती. दरम्यान, प्रारूप गट-गण रचनेची तपासणी करून आठ दिवसांनंतर अंतिम गट-गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असा अंदाज होता; परंतु आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी प्रारूप गट-गण रचना कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शासनाच्या नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये 7 ने तर पंचायत समितीच्या गणांमध्ये 14 ने वाढ झाली आहे. या नवीन नियमानुसार गटांची संख्या 82 व गणांची संख्या 164 झाली आहे. यामध्ये जुन्नर, खेड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी दोन शिरूर, मावळ, मुळशी, दौंड, पुरंदर, भोर बारामती तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढणार आहे, तर हवेली तालुक्यातील तब्बल सात गट कमी झाले आहेत. याशिवाय आंबेगाव आणि वेल्हा तालुक्यात कोणतीही वाढ होणार नाही. यामुळे वेल्हा तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील गट-गण रचनेत प्रचंड फेरबदल करण्यात आले आहेत. आता राज्य शासनाकडून आयोगाकडूनही प्रारूप गट-गण रचना कधी जाहीर होणार, अंतिम गट-गण रचनेचा कार्यक्रम कधी लागणार व आरक्षण सोडत कधी होणार, यांची प्रतीक्षा आहे.