जेव्हा पुणे महापालिकेच्या तब्बल २१५ जणांच्या हजेरीपत्रकावर पडतो ‘लेट मार्क’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:42 PM2019-05-21T12:42:04+5:302019-05-21T12:45:37+5:30
सोमवारी नेहमीप्रमाणे ऐटीत मुख्य इमारतीमध्ये पोहचले खरे... पण सुरक्षारक्षकांनी गेटच बंद करुन घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आले नाही.
पुणे : पालिकेच्या ‘लेट लतिफ’ कर्मचारी सोमवारी नेहमीप्रमाणे ऐटीत मुख्य इमारतीमध्ये पोहचले खरे... पण सुरक्षारक्षकांनी गेटच बंद करुन घेतल्याने कोणालाच आतमध्ये येता आले नाही. अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सकाळी दहा नंतर आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना जवळपास पाऊण तास बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. या सर्वांची नावे नोंदवून घेण्यात आली असून त्यांच्या हजेरी पत्रकावर ‘लेटमार्क’ लावण्यात येणार आहे.
पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये दररोज शेकडो नागरिक कामासाठी येत असतात. सकाळपासूनच ही रेलचेल सुरु झालेली असते. परंतू, त्यांना संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी सकाळी वेळेत भेटतीलच याची शाश्वती नसते. अनेकदा वरिष्ठ अधिकारी वेळेत कामावर हजर झालेले असतात, परंतू कनिष्ठांचाच पत्ता नसतो. गेले काही दिवस पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळांवर लक्ष ठेवून होते. उशिरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारपासून या लेट लतिफांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी दिले.
त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजता सुरक्षा विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सुरक्षारक्षकांना पालिकेमध्ये येणारे सर्व प्रवेशद्वार बंद करुन घेण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. दहानंतर आलेल्या कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्याला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गेटवर आरडाओरडा सुरु झाला. पावणे अकरा वाजता हे प्रवेशद्वार उघडण्यात आले. प्रत्येकाचा विभाग आणि पूर्ण नाव लिहून घेण्यात आले. या यादीनुसार हजेरी पत्रकावर लेट मार्क लावण्यात येणार आहेत.
यासोबतच कर्मचारी चहा अथवा कामांच्या नावाने सतत बाहेर जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बाहेर जाताना यापुढे खातेप्रमुखांची परवानगी घेऊनच बाहेर जावे असे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोमवारी सकाळी झालेल्या कारवाईमुळे दिवसभरात चहा घ्यायला बाहेर जाणाऱ्यांची संख्या एकदम घटल्याचे जगताप यांनी सांगितले.
====
बायोमेट्रिकचा उडाला फज्जा
पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आली होती. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. परंतू, कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरु करण्यात आलेली ही यंत्रणा अनेक वर्षांपासून बंदच आहे. याकडे कोणीही गांभिर्याने पहायला तयार नाही.
====
मुख्य इमारतीमध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी स्थानिक पातळीवरील क्षेत्रीय कार्यालयांमध्येही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. क्षेत्रीय कार्यालयांमधील उशिरा येणाऱ्यां अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
====
दररोज सकाळी दहा वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरा येणाºयांना शिस्त लागण्यास मदत मिळेल. तसेच जे अधिकारी-कर्मचारी वेळेत येतात त्यांच्यावर अन्याय होणार नाही. सोमवारी जवळपास २१५ जणांवर कारवाई करण्यात आली असून अतिरीक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचा नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी निश्चित फायदा होईल.
- माधव जगताप, सुरक्षा विभाग प्रमुख तथा अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख