जेव्हा तपासणीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्याचीच होते हॉस्पिटलकडून अडवणूक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:18 PM2018-05-18T13:18:22+5:302018-05-18T13:18:22+5:30
तपासणीसाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला अचानक अँजिओग्राफी करावी लागते. यानंतर सोबत बिलाची रक्कम नसल्याने ही रक्कम भरल्यावरच तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल, अशी आडमुठी भूमिका रुग्णालय प्रशासनाकडून घेतल्यावर अधिकाऱ्याला फक्त मनस्ताप सहन करावा लागतो.
पुणे : आरोग्य विभागाच्या वतीने महापालिकेच्या अधिका-यांसाठी कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पीटलमध्ये मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानुसार एक अधिकारी आरोग्य तपासणीसाठी गेले असता त्यांना तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली. केवळ तपासणीसाठी गेलेल्या या अधिका-याला बिलाची रक्कम तातडीने देणे शक्य नव्हते. बिलाची रक्कम न दिल्याने हॉस्पीटल प्रशासनाने अधिका-याला डिस्जार्च देण्सास ठाम नकार दिला. यामुळे अधिका-याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे महापालिकेच्यावतीने नगरसेवक आणि अधिका-यांसाठी कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पीटलसोबत करार करून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. नुकतेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सकाळी तपासणीसाठी हॉस्पीटलमध्ये गेले. मोफत तपासण्या असल्याने त्यांनी सोबत फारसे पैसेही नेले नव्हते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने अँजिओग्राफी करण्यास सांगितले. डॉक्टराने तातडीने सांगितल्याने अधिकारी देखील लगेच तयार झाले. डॉक्टरांनी देखील त्वरीत आॅपरेशन केले. संध्याकाळी अधिका-याने डिस्चार्ज द्या, असे सांगितले. यावर रुग्णालय प्रशासनाकडून तुम्हाला २२ हजार रुपये भरावे लागली. त्यानंतरच डिस्चार्ज दिला जाईल असे उत्तर आल्यावर संबंधित अधिका-यांना फोन केला. त्यावेळी संबंधित आरोग्य अधिका-यांनी हे शिबिर आपल्या अख्त्यारीत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ महिला अधिका-याला फोन लावला. त्यांनी मुलाला पैसे घेऊन बोलवा आणि डिस्चार्ज घ्या, असा सल्ला दिला. सुट्टयांमुळे कुटुंबीय पुण्यात नसल्याने अधिका-यांची चांगलीच अडचण झाली. अखेर ज्या आरोग्य प्रमुखाच्या समन्वयातून हे आरोग्य शिबिर झाले त्यांचा फोन आला. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर दीड हजार रुपये घेऊन अधिका-याला घरी सोडण्यात आले.