पुणे तुंबल्यावर महापालिका खडबडून जागी; तक्रारीच्या फोनची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा! आयुक्तांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:42 AM2024-06-13T10:42:10+5:302024-06-13T10:43:22+5:30
नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणे याबाबत विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात
पुणे: शहरात जोरदार पावसानंतर महापालिका प्रशासन सर्वच स्तरावरून टीकेचे धनी ठरले. विविध पक्ष, स्वयंसेवी संस्था आदींनी महापालिकेवर टीकेची झोड उठवल्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन, आता तक्रारींचे फोन येण्याची वाट पाहू नका, स्वत:हून कामे करा, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
महापालिकेच्या ढिसाळ यंत्रणेवर सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होत असताना ढिम्म प्रशासनाला हलविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सर्व खातेप्रमुख, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी यांना बोलवून आपत्तीदरम्यान सुट्टीच्या दिवशीही मनुष्यबळ सतर्क ठेवावे, असे सांगितले. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील नालेसफाई कितपत झाली आहे याचा आढावा घ्यावा. संबंधित ठेकेदाराकडून उर्वरित कामे प्राधान्याने करून घ्यावेत, असे सांगितले.
डॉ. भोसले म्हणाले...
- मेट्रो, ‘पीएमआरडीए’कडून सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी रस्ते दुरुस्ती महापालिकेच्या स्तरावर करावी. हा खर्च नंतर आपण संबंधित संस्थांकडून घेऊ.
- महापालिकेच्या मुख्य खात्यांनी क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय साधून पावसाळी कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.
- पावसाळा संपेपर्यंत सर्व कामे करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच राहील, अशा सूचना त्यांना द्याव्यात.
- झाडे पडण्याच्या घटना कमी करण्यासाठी फांद्या छाटणीसंदर्भात कार्यवाही करावी.
- क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याकडील उपलब्ध मशीनरी, साधन सामग्री याची माहिती घेऊन ते उपलब्ध करून द्यावे. वेळ पडली तर नव्याने खरेदी करावी.
- नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणे याबाबत विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययाेजना कराव्यात.
क्षेत्रीय अधिकारी नोडल ऑफिसर
महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या पावसाळ्यात नोडल ऑफिसर म्हणून काम करावे. त्यांनी सहायक आयुक्तांच्या संपर्कात राहून आवश्यक ती साधनसामग्री, मशीनरी, उपलब्ध करून नागरिकांच्या सेवेत कायम राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.