‘रुपी’च्या दोषींवर कारवाई कधी?
By admin | Published: March 27, 2016 03:02 AM2016-03-27T03:02:57+5:302016-03-27T03:02:57+5:30
सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची
पुणे : सहकार खात्याने रुपी को-आॅपरेटिव्ह बँक डबघाईला आणण्यासाठी तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांना दोषी ठरविले. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर वसुलीची थेट कारवाई होणे अपेक्षित असतानाही गेल्या २ महिन्यांपासून सहकार खात्याने काहीच केलेले नाही. या दोषींवर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल रुपीचे खातेदार विचारू लागले आहेत.
रुपी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी १४ वर्षांनंतर पूर्ण झाली आणि त्यात तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांच्याकडून १ हजार ४९० कोटी रुपये वसुलीची शिफारासही चौकशी अधिकारी
डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी केली केली.
हा अहवाल सहकार आयुक्तांकडे देऊन दोन महिने होत आल्यानंतरही अजूनही या अहवालानुसार वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले गेलेले नाहीत, असा आरोप पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी केला. ते म्हणाले, कलम ८८ नुसार दोषी ठरविलेल्यांकडून वसुलीचे आदेश दिले आहेत. मात्र अजूनही काहीच करण्यात आलेले नाही. चौकशी १४ वर्षे सुरू राहिली, आता वसुलीचा खेळ १४ वर्षे सुरू राहणार आहे का? एकीकडे असे असताना स्वत:चे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलन करणाऱ्या खातेदारांवर मात्र पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत, हा कोणता न्याय आहे. (प्रतिनिधी)
खातेदारांची बैठक
दोषी संचालक व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने २८ मार्चला सायंकाळी ५ वाजता लक्ष्मी सांस्कृतिक सभागृह, लक्ष्मी बाजार, जुन्या रामोशी गेट पोलीस चौकीजवळ येथे मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती थत्ते यांनी दिली.
आंदोलनाचा इशारा
रुपीसह महेश, राजगुरुनगर, कराड या बँकांमध्ये झालेल्या वाहन घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरील प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
स्वच्छतेची भाषा बोलणाऱ्या सहकारमंत्र्यांना हे शोभते का, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात लवकरच सहकार आयुक्तांनी
ठोस निर्णय घेतला नाही तर
रस्त्यावर उतरून आंदोलन उभे
करण्यात येईल, असा इशाराही थत्ते यांनी दिला.