व्हीआयटी प्रवेशातील गोंधळावर कारवाई केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:54+5:302021-03-08T04:12:54+5:30
पुणे : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) मधील प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळाचा चौकशी अहवाल ‘सीईटी-सेल’कडे जमा करण्यात आला आहे. ...
पुणे : विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) मधील प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळाचा चौकशी अहवाल ‘सीईटी-सेल’कडे जमा करण्यात आला आहे. मात्र, अत्यल्प संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोषींवर केव्हा कारवाई होणार? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
व्हीआयटीमध्ये गुणवत्ता डावलून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब काही विद्यार्थी संघटनांनी पुणे विभागीय तंत्र शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र नागरी कृती समिती या संघटनेने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्यावर सामंत यांची या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीईटी-सेलने समिती स्थापन केली. या समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे.परंतु, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन म्हणाले की, व्हीआयटीमधील प्रवेशप्रक्रियेतील गोंधळची चौकशी करण्याची मागणी सामंत यांच्याकडे केली होती. परंतु, या प्रकणातील दोषी अधिकाऱ्यांवर व संस्थेवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभाग दोषींना अभय देत आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
----
पुणे विभागीय तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी सेवानिवृत्त झालेले असताना सुध्दा कार्यरत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालायाला देण्यात आले आहे.
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडेंट हेल्पिंग हॅण्ड