...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:13 PM2020-11-05T19:13:51+5:302020-11-05T19:38:21+5:30
आतापर्यंत राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खानला बारामतीने भुरळ घातली आहे.
बारामती : राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खान देखील आतापर्यंत बारामती येथील कृषी संशोधन पाहुन भारावले आहेत. आश्चर्य म्हणजे आमिर खानने तर बारामतीत चक्क आठ दिवस मुक्काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता या 'बड्या' यादीमध्ये तेलंगणाच्या 'कृषिमंत्र्यां'ची भर पडली आहे.
तेलंगणाच्या कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी त्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी(दि ५) बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट दिली. यावेळी बारामती येथील कृषी क्षेत्रातील अनेक विलक्षण प्रयोग,आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा सुंदर मिलाफ पाहून कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांच्यासह कृषी सचिव बी. जनार्दन रेड्डी, कृषी संचालक एल. वेंकटराम रेड्डी, सहसंचालक व्ही सरोजिनी देवी, उपसंचालक एम.व्ही. मधुसूदन, अपेडाचे उपमहासंचालक नागपाल लोहकरे, संशोधन संचालक डॉ. ए. भगवान, उपसंचालक के. वेणुगोपाल यांचे शिष्टमंडळ अतिशय प्रभावित झाले.
कृषिमंत्री व त्यांच्या शिष्ट मंडळाचे ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी स्वागत करून त्यांना येथील कृषीतंत्रज्ञान प्रसाराच्या कामाची माहिती दिली. रेड्डी यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करत जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे कामकाजाची माहिती घेतली. येथील भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रासही त्यांनी भेट दिली. मधमाशीपालन व शेती उत्पादन वाढण्यासाठी त्याच्या उपयोगाची त्यांनी माहिती घेतली.