Sushma Andhare: 'सरकार पेशवाईच असल्यावर आम्ही काय अपेक्षा करावी...' सुषमा अंधारेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:56 PM2023-01-02T14:56:11+5:302023-01-02T15:02:33+5:30
विजयस्तंभ अभिवादनास राज्य सरकारमधील मंत्री येणं अपेक्षितच नाही
पुणे : कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी २०५ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना, व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी मानवंदना दिली. राजकीय नेते, मंत्री यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा कोरेगाव भीमा येथे भेट देऊन विजयस्तंभास मानवंदना दिली. त्यावेळी अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारमधील कोणीही मंत्री येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित नाहीत, या प्रश्वावर अंधारे म्हणाल्या, सरकारमधील मंत्री येणं, अपेक्षितच नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर सरकार पेशवाईच असल्यावर आम्ही काय अपेक्षा करावी अशी त्या म्हणाल्या आहेत.
कोरेगाव भिमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज , महार रेजीमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजीमेंटच्या अनेक शुरविरांना वीरमरन आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागली.
अंधारे म्हणाल्या, अजित पवार पालकमंत्री असताना या ठिकाणी येऊन अभिवादन करत असे. पण आताचं सरकारच पेशवाईचं आहे, तर या पेशवाईकडून आम्ही कशी काय अपेक्षा करावी.”“ज्या पेशवाईचा पाडाव केल्यानंतर, हा विजय स्तंभ उभा राहिला, त्या पेशवाईचाच वसा अन वारसा चालविणारे लोकच जर या सरकारमध्ये असतील, तर त्यांनी इथे अभिवादन करण्याची अपेक्षा फोल ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आंबेडकरी जनता काय असते, हे दाखवलं जाईल
करणी सेनेच्या मागे, बोलविते धनी कोण असेल तर ते आरएसएस आणि भाजपच आहे. मात्र आपल्याला करणी सेनासारख्या चिल्लर सेनेबाबत मला काही बोलायचं नाही. भाजपामधील किमान एखाद्याच जबाबदार व्यक्तिने करणी सेनेसारखी भूमिका बोलवूनच दाखवावी. मग आंबेडकरी जनता काय असते, हे दाखवलं जाईल असे आव्हानच अंधारे यांनी दिले.
पेरणे फाटा येथे काल मोठ्याप्रमाणावर मानवंदनेसाठी गर्दी करण्यात आली होती. दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली काढीत विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील नियोजित कार्यक्रमास कालपासूनच सुरवात झाली. समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. मानवंदनेसाठी आलेल्या प्रमुख मान्यवरात केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले , मंत्री दिपक केसरकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भीम आर्मिचे चंद्रशेखर आजाद , पीपल्स रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन सेना दलित कोब्रा, बहुजन समाज पार्टी, भीमशक्ती, सामाजिक विकास संघटना, बहुजन सुरक्षा गट, झोपडपट्टी सुरक्षा दल,भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ, बुद्दिष्ट मुव्हमेंट सेंटर ट्रस्ट, फुले-शाहू आंबेडकर विचार मंच, भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आदींसह बार्टि व विविध संस्था व पदाधिर्कायांचा समावेश होता.