नाट्यगृहांची ‘तिसरी घंटा’ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:14+5:302021-08-18T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दुकाने, मॉल सुरू झाले, पीएमपी बससेवा कार्यान्वित झाली. मात्र, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणा-या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दुकाने, मॉल सुरू झाले, पीएमपी बससेवा कार्यान्वित झाली. मात्र, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणा-या नाट्यगृहांचा पडदा अद्यापही बंदच आहे. ना कलाकारांच्या हाताला काम, ना महापालिकेच्या महसुलात वाढ. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगाअभावी महापालिकेच्या १४ नाट्यगृहांच्या उत्पन्नात घट झाली आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षात अवघे ४४ लाख ५४ हजार रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे महापालिकेची नाट्यगृहे बंद होती. मध्यंतरीच्या काळात ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे खुली झाली आणि प्रेक्षकांची पावले नाट्यगृहाकडे वळली. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पुन्हा नाट्यगृहांना बसला. अजूनही नाट्यगृहांचा पडदा उघडलेला नाही. याचा परिणाम नाट्यगृहांच्या उत्पन्नावर झाला आहे. नाट्यप्रयोगांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भाडे आकारणीनुसार दरवर्षी ५ कोटीचे उद्दिष्ट ठेवले जाते. यंदा १४ नाट्यगृहांत नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सव काहीच झाले नाही, त्यामुळे नाट्यगृहांचे उत्पन्न एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात पूर्णपणे घटले असल्याचे बालगंधर्व रंगमंदिराचे मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------------------------
चौकट
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळातील नाट्यगृहांचे उत्पन्न...
(वस्तू आणि सेवा करासह)
बालगंधर्व रंगमंदिर (१० लाख २० हजार २४ रुपये)
गणेश कला क्रीडा मंच (२० लाख ६५ हजार १७६ रुपये)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (३ लाख १८ हजार ९१९ रुपये)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (३ लाख ६६ हजार ४४४ रुपये)
१४ नाट्यगृहांचे एकूण उत्पन्न (४४ लाख ५४ हजार ०६ रुपये)
----
चौकट
नाट्यगृह स्वच्छता सुरू होईल
कोरोनाकाळात महापालिकेच्या नाट्यगृह स्वच्छतेसाठीच्या निविदा काढण्यासाठी अनेक अडचणी आल्या. पण, आता बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह या चार नाट्यगृहांच्या स्वच्छतेच्या निविदा काढण्यात आल्या असून, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे एक कोटी ४३ लाख रुपयांच्या या निविदा आहेत. नाट्यगृहे सुरू झाल्यानंतर या चारही नाट्यगृहांत निविदेची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामार्फत स्वच्छतेची कामे सुरू होतील.
- सुनील मते, मुख्य व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर
---------------------------------------