उद्यानांची दुरवस्था संपणार कधी?
By Admin | Published: November 15, 2016 03:14 AM2016-11-15T03:14:33+5:302016-11-15T03:14:33+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण १५७ छोटी-मोठी सार्वजनिक उद्याने उभारली आहेत. भोसरीतही यांपैकी १० उद्याने आहेत. त्यातील भोसरी सहल केंद्र,
भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एकूण १५७ छोटी-मोठी सार्वजनिक उद्याने उभारली आहेत. भोसरीतही यांपैकी १० उद्याने आहेत. त्यातील भोसरी सहल केंद्र, आळंदी रोड येथील सखुबाई गवळी उद्यान, मॅगझिन चौक परिसरातील रामभाऊ गवळी बालोद्यान अशी मोठी उद्यानेही या भागात आहेत. पण यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली दिसून येते. सहल केंद्रातील बोटिंग बंद झाली असून, देखभालीच्या अभावाने या उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. रामभाऊ गवळी बालोद्यान तर जंगलच झाले आहे. सुरक्षारक्षकांच्या अभावाने हे उद्यान मद्यपींचा अड्डा बनला असून, त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
भोसरी सहल केंद्र हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान महापालिकेने पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. पण सध्या या उद्यानात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही.
जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात रोज जमा होणारा कचरा उद्यानातच ठिकठिकाणी ढीग करून ठेवला जातो किंवा पेटवून दिला जातो. त्यामुळे स्वच्छता असली, तरी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. कंत्राटी तत्त्वावर दिलेले बोटिंग क्लब बंद असून, बोटींची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील जॉगिंग ट्रॅकभोवतीचे सर्वच सांगीतिक दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
आळंदी रस्त्यालगतचे सखुबाई गवळी उद्यान हे त्या मानाने इतर उद्यानांपेक्षा सुस्थितीत आहे. अगदी कमी जागेत विकसित केलेल्या या वैविध्यपूर्ण उद्यानात आबालवृद्ध व महिला सकाळ-संध्याकाळी गर्दी करीत आहेत. मॅगझिन चौकातील येथे रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात कसलीही सुविधा उपलब्ध नाही.
(वार्ताहर)