मुख्य सूत्रधाराचा शोध कधी?
By admin | Published: December 24, 2014 01:29 AM2014-12-24T01:29:55+5:302014-12-24T01:29:55+5:30
बेकायदापणे पिस्तूल बाळगणाऱ्यांना सापळा रचून पकडले जाते. पिस्तूल जप्त करून अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीही केली जाते
मंगेश पांडे, पिंपरी
बेकायदापणे पिस्तूल बाळगणाऱ्यांना सापळा रचून पकडले जाते. पिस्तूल जप्त करून अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीही केली जाते. मात्र, पिस्तूल येतात कोठून, विक्रीचे ‘रॅकेट’ चालविणारा दलाल कोण, याच्या मुळापर्यंत जाण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहर व परिसरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामध्ये बेकायदा पिस्तुलांचा अधिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पिंपरी पोलिसांनी सोमवारी चिंचवडमध्ये तब्बल सात बेकायदा पिस्तूल आणि ३३ जिवंत काडतुसे जप्त केली. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा पिस्तूल सापडणे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वीच कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची चिखलीजवळील पूर्णानगर येथे हत्या झाली. पुण्यात टोळी युद्धातून दोन खून झाले आहेत. या घटनांमध्ये बेकायदा पिस्तूलचा वापर झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. अशातच सोमवारी सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे पोलिसांपुढील आव्हान आणखी वाढले आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्यांवर सापळा रचून कारवाई केली जाते. अटक करून चौकशी केल्यानंतर त्यामागचे ‘रॅकेट’ कसे उघडकीस येईल याचा पाठपुरावा अपेक्षित असतो. मात्र तसे होताना दिसत नाही. केवळ अटक केलेल्या आरोपींपर्यंतच पोलीस तपास पोहोचतो. यामध्ये पिस्तूल विक्रीच्या रॅकेटपर्यंत पोलीस का पोहोचत नाहीत. पिस्तूलविक्री करणारे पोलिसांच्या गळाला का लागत नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारित आहेत.
बेकायदापणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या बहुतेक आरोपींची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्याचे दर वेळी पोलीस सांगतात. परंतु पिस्तूल कोणाकडून आले हे सांगणारे खबरे पोलिसांना का भेटत नाहीत? एकापाठोपाठ एक गुन्हेगारीच्या घटना घडतात. खून पडतात.
तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी पिस्तूल तयार करणाऱ्याला मध्यप्रदेशातून अटक केली. पिस्तूल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त करण्यात आले. मात्र, परराज्यांतून पिस्तूल आणून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विकणाऱ्या दलालांचेही मोठे जाळे आहे.