सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 06:59 PM2021-08-29T18:59:06+5:302021-08-29T18:59:38+5:30
सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत
पुणे : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणा-या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला आहे. मात्र, अद्याप सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिध्द होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पुण्यात सांगितले.
पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी उदय सामंत यांनी संवाद साधला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. सीईटी परीक्षांसाठी राज्यातील पूर्वीची 193 परीक्षा केंद्र 350 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला.
महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता धूसर
कोरोना परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येताना दिसत असेल तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे टास्क फोर्स कडून प्राप्त होण्या-या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,असे उदय सामंत यांनी नमूद केले. परिणामी महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता पुन्हा धूसर झाल्याचे दिसून येत आहे.
पत्रकारिता विषयात विद्यार्थ्यांना पीएच. डी संदर्भात विद्यापीठाची चर्चा करून निर्णय
केवळ मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातमध्ये पत्रकारिता विषयात विद्यार्थ्यांना पीएच. डी. करता येत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, अद्याप यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही. याबाबत उदय सामंत यांनाच पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्यापीठाची चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.