रुद्र गंगेवरील बंधारे दुरुस्त होणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:29+5:302021-05-17T04:10:29+5:30
परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या ...
परिंचे : दक्षिण पुरंदरमधून वाहणाऱ्या रुद्र गंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत, पुरंदरमधील प्रशासनाकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू होणार असून, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम न झाल्यास रुद्रगंगा नदीत पाणी साठवणूक करणे अवघड जाणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
दक्षिण पुरंदरमध्ये दहा सप्टेंबर दरम्यान कांबळवाडी, हरगुडे, पांगारे व परिंचे परिसरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये कांबळवाडी, हरगुडे परिसरातील अनेक बंधारे, माती बांध फुटून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी रुद्र गंगा नदीला कधी नव्हे एवढा मोठा पूर आला होता. या पुरात वाहून आलेली मोठी झाडेझुडपे नदीवरील बंधाऱ्यामध्ये अडकली आहेत. पुराचा प्रवाह मोठा असल्याने हे पाणी नदीपात्राशेजारील शेतात घुसून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी नदीचे पात्र बदलले आहे. यादववाडी, परिंचे येथील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
जलयुक्त शिवार योजनेतून गेल्या तीन वर्षापूर्वी रुंद्र गंगा नदीवर अनेक बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. याचा फायदा नदीकाठच्या गावांना झाला आहे. भूजल पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले. नदीला आलेल्या पुरात अनेक बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक बंधाऱ्यांना तडे गेले आहेत, अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून हे बंधारे दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. बंधारे दुरुस्ती करण्याची मागणी परिंचे परिसरातील शेतकरी करत असून कृषी व मृद संधारण विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीने या फुटलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
फोटो : परिंचे (ता.पुरंदर) रुद्र गंगा नदीवरील अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत असून स्थानिक शेतकऱ्यांकडून दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.