दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार? आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 11:23 AM2024-01-08T11:23:38+5:302024-01-08T13:30:01+5:30
पुणे : जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासत आहे. शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे; ...
पुणे : जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासत आहे. शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे; पण सरकारने अजूनही दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाला, नागरिकांना मदत दिलेली नाही आणि त्यांच्यापर्यंत दुष्काळग्रस्तांसाठीच्या सुविधाही पोहोचवल्या नाहीत, याकडे सरकारचे लक्ष वेधत ‘दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार?,’ असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शनिवारी (ता. ६) उपस्थित केला.
सरकारने ४० तालुके आणि सुमारे १,२०० महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे; पण या भागात कुठलीही उपाययोजना अद्याप केली नाही आणि दुष्काळग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतही दिली नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी केली आहे.
आमदार धंगेकर म्हणाले, ‘यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. देशाची भूक भागवणारा, काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी बांधव संकटात सापडला आहे; पण सरकारतर्फे कुठलीही मदत दुष्काळग्रस्त नागरिक, शेतकरी बांधव यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारी जनता प्रचंड अस्वस्थ आणि सरकारवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.’
शेतकऱ्यांवर सातत्याने एकामागून एक संकटे कोसळत आहेत. कधी पावसात खंड तर कधी गारपीट यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम दोन्ही डोळ्यांदेखत वाहून गेले. पाण्याअभावी रब्बीसुद्धा संकटात सापडली आहे. तर दुसरीकडे, अनेक संकटांपासून वाचवलेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नेमके जगावे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.
सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र, जिथे सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आहे, तेच तालुके सरकारने निवडले, अशी टीका झाल्यानंतर १,२०० महसूल मंडल हे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले. या घोषणेला बरेच दिवस झाले; पण अद्याप एक नवा पैसा दुष्काळग्रस्तांना मिळाला नाही. दुष्काळाच्या सुविधाही मिळाल्या नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. शासकीय सुविधा तातडीने द्याव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी केली.