रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची लूट थांबणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:20+5:302021-09-16T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बॅग सॅनिटायझ करण्यासाठी तसेच सॅनिटायझर व ग्लोज घेण्यासाठी विनाकारण सक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बॅग सॅनिटायझ करण्यासाठी तसेच सॅनिटायझर व ग्लोज घेण्यासाठी विनाकारण सक्ती केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने हे ऐच्छिक आहे असे जाहीर केले. मात्र, स्थानकावरचे विक्रेते आजही प्रवाशांवर याची सक्ती करीत आहेत. रेल्वे प्रशासनदेखील याबाबत बोटचेपी भूमिका घेत कारवाई करण्यासाठी कोणीतरी तक्रार करण्याची वाट पाहत आहे. सर्वांच्या देखत गरीब प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबणार कधी, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर पुणे रेल्वे स्थानकावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनाने खासगी मक्तेदारास बॅग सॅनिटायझ करणे, सॅनिटायझर, ग्लोज व मास्कची विक्री करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, यासाठी प्रवाशांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये असा आदेश देण्यात आला. हे ऐच्छिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती स्थानकावर निर्माण झाली. प्रवासी येताना-जाताना त्यांच्याकडून जबरदस्तीचे बॅग सॅनिटायझ केल्या जात आहेत. एका बॅगच्या बदल्यात त्यांच्याकडून १० रुपये घेतले जातात. बॅग सॅनिटायझ केल्यानंतर त्याच्याशेजारी असलेले विक्रेते त्यांच्या जवळील मास्क, सॅनिटायझर घेण्यासाठी दबाव निर्माण करतात. त्या प्रवाशाकडे जरी मास्क, सॅनिटायझर असले तरी ते घेण्यास त्यास भाग पाडले जाते. विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना ही मंडळी हेरतात. त्यांच्याकडून ३० ते ८० रुपये उकळले जातात. हे सर्व तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यासमोर घडते. तरी देखील त्यास मज्जाव करीत नाही हे विशेष.
कोट : प्रवाशांनी बॅग सॅनिटायझ करणे हे ऐच्छिक आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी आम्ही तिथे ऐच्छिक असल्याचे माहिती फलक लावले आहे. असे प्रकार घडत असतील तर प्रवाशांनी रेल्वेकडे तक्रार करावी. आम्ही योग्य ती कारवाई करू.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.
कोट : पुणे स्थानकावर प्रवाशांची होणारी लूट ही तत्काळ थांबली पाहिजे. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची जर एवढी काळजी असेल तर त्यांनी कोरोनाच्या काळात स्वतः तयार केलेले सॅनिटायझर मोफत उपलब्ध करून द्यावे. हा प्रकार नाही थांबला तर सर व्यस्थापकापर्यंत याची तक्रार केली जाईल.
- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे.