Monsoon In Maharashtra: महाराष्ट्रात मान्सून कधी बरसणार? हवामानशास्त्र विभागाने दिली माहिती
By श्रीकिशन काळे | Published: June 15, 2023 05:07 PM2023-06-15T17:07:27+5:302023-06-15T17:12:47+5:30
मॉन्सूनचे ८ जून रोजी केरळला धडक मारली...
पुणे : राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी तो कोकणात रेंगाळला आहे. अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. कोकण साेडला तर इतर राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामानशास्त्र विभागाने २३ जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मॉन्सूनचे ८ जून रोजी केरळला धडक मारली. यंदा तो उशीरा आला तरी अजूनही म्हणावा तसा दमदार बरसलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा निराश झालेला आहे. राज्यात पुढच्या ४,५ दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी पुढील चार आठवड्याचा अंदाज दिला आहे. त्यामध्ये २३ जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस नसल्याने पेरण्याही झालेल्या नाहीत. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असा अंदाज यापूर्वीच कृषी हवामानशास्त्रज्ञांनी दिलेला आहे.
सध्या पुणे शहरात दुपारी निरभ्र आकाश आणि ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. परंतु, पावसाचे वातावरण मात्र तयार होत नाही. सर्वजण मॉन्सूनची वाट पाहत आहेत. दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यानंतर वरूणराजा बरसतो. तेव्हाही पावसाने निराशाच केली आहे. पावसाविनाच पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झालेला पहायला मिळाला.
बिपरजॉय या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पावसावर काहीही परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. आज कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पावसासाठी अजूनही तरी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.