मुळा-मुठा नदी स्वच्छ होणार कधी?
By admin | Published: June 10, 2017 02:15 AM2017-06-10T02:15:38+5:302017-06-10T02:15:38+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या सर्वच नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. मुळा, मुठा या नद्यांची गणना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदननगर : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या सर्वच नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. मोठ्या प्रमाणावर दूषित झालेल्या या नद्यांचे शुद्धीकरण तातडीने करण्याची गरज आहे.
खराडी येथील मुळा-मुठा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. नदीकाठचा परिसरातही स्वच्छता करण्याची गरज भासत आहे. मुळा व मुठा खराडी पूल येथे सर्वाधिक प्रदूषित झाल्या आहेत. या नद्या मैलापाणी आणि सांडपाण्यामुळेच प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरात काही प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
काही नागरिक तर नदीपुलावरून थेट नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. काही वेळा तर टेम्पो भरून हॉटेल व्यावसायिकांचा कचरा नदीत टाकल्याचे प्रकार घडत आहेत. अशा कचरा टाकणाऱ्यांवर व नदी प्रदूषित करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. येथील नदी स्वच्छतेविषयी संबंधित विभागाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
मुंढवा जॅकवेलमुळे पाणी अडविण्यात आले असून त्या पाण्यामुळे खराडी परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच जलपर्णीने पूर्ण विळखा घातल्याने खराडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपा आरोग्य विभागाला कधी जाग येणार व ही जलपर्णी हटविणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. जलपर्णीमुळे खराडी गावात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खराडी गावातील नागरिकांना साथीच्या आजारांची लागण झाली असून थंडी-ताप, खोकला, सर्दी, पुरळ येणे अशा प्रकारचे आजार वाढले आहेत.