Police Bharti 2024: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 03:41 PM2024-12-10T15:41:28+5:302024-12-10T15:41:44+5:30
मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत
बारामती : संपूर्ण महाराष्ट्रात १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ संपत आलेली आहे. अनेक उमेदवार निवड होऊन प्रशिक्षणही घेत आहेत. तर काही उमेदवारांचे प्रशिक्षण कालावधी वेतनही सुरू झालेले आहे. परंतु मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत.
मुंबईबरोबरच पुणे कारागृह पोलीसाची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा ही अद्यापर्यंत बाकी आहे. याबाबत अधिक माहिती देताना बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली असून मुंबईमध्ये २ हजार ५७२ एवढ्या मोठ्या जागांची भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईला संपूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास ३० टक्के उमेदवार फॉर्म भरतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या काही हजारांमध्ये असते. तरी गृह विभागाने व पोलीस खात्याने लवकरात लवकर लेखी परीक्षेची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. परंतु काही जिल्ह्यांची रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस भरती प्रकिया कालावधीमध्येच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे व आचारसंहिता असल्यामुळे ही भरती प्रक्रिया काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली. परंतु २५ नोव्हेंबर २०२४ रोजी आचारसंहिता संपल्यानंतरही अजूनही मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरत चालली आहे. त्यातच शासनाने लवकरच नवीन पोलीस भरती प्रकिया ही जाहीर केली जाईल, असे घोषित केल्यामुळे उमेदवारांना पुढे होणाऱ्या भरती प्रकियेचे वेध लागले आहेत. परंतु जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवीन भरती प्रक्रिया संदर्भातील आदेश येऊ शकत नाही. याची उमेदवारांना जाणीव आहे. तरी पोलीस खात्याने व गृह विभागाने या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विद्यार्थ्यांमधून मागणी होत आहे.