'पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!' माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:11 AM2024-06-29T11:11:27+5:302024-06-29T11:12:38+5:30
आनंददायी असणाऱ्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन हा सोहळा स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे....
आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होत आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि. २९) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवणार आहेत. आनंददायी असणाऱ्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन हा सोहळा स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. आता प्रत्येकाला वेध लागले आहेत, ते फक्त माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचे.
तत्पर्वी, श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, वारकऱ्यांच्या दर्शनबारीत रांगा लागल्या आहेत. पासव्यतिरिक्त भाविकांना महाद्वारातून प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने मंदिराच्या दर्शन बारीतूनच भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.
भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकारामां’चा गजर करत दिंड्या, तसेच पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी आळंदी नगरीत दाखल झाल्याने पूर्वसंध्येला पवित्र इंद्रायणीकाठ वारकऱ्यांनी गजबजून निघाला आहे. इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानपूर्वीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. आळंदीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दिंड्यांचे वास्तव्य आहे.
पायी येणाऱ्या दिंड्यांना गावोगावी चहा, पाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था केली जात आहे. आळंदीत दाखल झालेल्या दिंड्यांनी शहरात ठीकठिकाणी राहुट्या उभारल्या आहेत. राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्वरीच्या ओवींचे पठण करण्यात वारकरी दंग झाले आहेत. धर्मशाळा, विवाह कार्यालयांमध्ये माऊलींचा नामघोष सुरू आहे. आळंदीचे रस्ते, छोटी-मोठी दुकाने, हॉटेल वारकऱ्यांनी भरली असून, पायीवारी प्रस्थानपूर्वी वारीदरम्यान लागणारी आवश्यक सामग्री वारकरी खरेदी करत आहेत. चप्पल, बूट, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करून व्यवस्थितपणे त्या पिशवीत भरून ठेवल्या जात आहेत. वारीला प्रस्थान ठेवण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने वारकरी भक्तीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
पहाटे संजीवन समाधीवर पवमान अभिषेक
माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान सोहळ्यानिमित्त मंगळवारी (दि. २९) पहाटे चार ते साडेपाच वाजता माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारादरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. अकरा ब्रम्हवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माऊलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल. तद्नंतर माऊलींचे हरीनाम गजरात मंदिरातून प्रस्थान होईल.
प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात ‘श्रीं’चे रथापुढील २० आणि रथामागील २७ यांसह अन्य ९ उपदिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख, फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलिस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे.
असा असेल प्रस्थान सोहळा...
* पहाटे ४ वा. घंटानाद, पहाटे ४:१५ काकडा, ४:१५ ते ५:३० वा. पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती, ५ ते सकाळी ९ श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा, ६ ते १२ वा. भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, ९ ते ११ वा. कीर्तन - वीणा मंडप, १२ ते १२:३० गाभारा स्वच्छता, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवेद्य, दु. १२:३० ते १ वा. भाविकांना समाधीचे दर्शन, दु. १:३० ते २ प्रस्थान सोहळ्याच्या ४७ दिंड्या मंदिरात घेण्यास सुरुवात व श्रींना पोशाख, दुपारी ४ वा. श्री गुरू हैबतरावबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, तद्नंतर संस्थान तर्फे श्रींची आरती, प्रमुख मानकऱ्यांना नारळप्रसाद वाटप, वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीमध्ये ‘श्रीं’च्या चलपादुका ठेवल्या जाणार.
* पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान व मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून बाहेर - प्रदक्षिणा मार्गाने भराव रस्ता - भैरवनाथ महाराज चौक - हजेरी मारुती - चावडी चौक - महाद्वार चौकातून दर्शन मंडप इमारत (गांधीवाडा) येथे मुक्काम, ‘श्रीं’ची समाज आरती (गांधीवाडा), भाविकांना दर्शन जागराचा कार्यक्रम.