परराज्यांत जाणाऱ्या रातराणी बस कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:35+5:302021-08-01T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटी सेवा आता पूर्व पदावर आली आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटी सेवा आता पूर्व पदावर आली आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या सोबतच आंतरराज्य रातराणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, काही राज्यांनी एसटीला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आंतरराज्य एसटी सेवा प्रभावित झाली आहे. यात आंतरराज्य जाणाऱ्या रातराणीचा देखील समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना आता परराज्यांत जाणाऱ्या रातराणी बस सुरू होणार कधी? हा प्रश्न भेडसावत आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी बंद असलेली पुणे विभागाची रातराणी आता पुन्हा सुरू झाली आहे. प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना सर्वात चांगला प्रतिसाद आहे. मात्र, आंतरराज्य धावणारी बडोदा वगळता पुणे विभागाची रातराणी अजूनही बंद आहे. त्यामुळे प्रवासी नाइलाजाने ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत.
संध्याकाळी सात ते पहाटे पाच या दरम्यान रातराणी धावते. याचे दर लालपरीच्या तुलनेने जास्त आहे. तरी देखील याला प्रवाशाचा प्रतिसाद चांगला आहे.
बॉक्स 1
राज्यांतर्गत सुरू असलेले रातराणी :
पुणे विभागाच्या राज्यांत धावणाऱ्या रातराणी बहुतांश गाड्या सुरू झालेल्या आहेत. यात पुणे-मुंबई, पुणे - ठाणे, पुणे-सोलापूर, पुणे-पनवेल, पुणे-कोल्हापूर, पुणे-औरंगाबाद, पुणे-रत्नागिरी, पुणे-बोरिवली आदी प्रमुख मार्गावर रातराणी धावत आहे.
बॉक्स 2 :
परराज्यांत जाणाऱ्या रातराणी बंद :
पुणे विभागाची पुणे-इंदोर, पुणे-पणजी या परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंद आहे. मध्य प्रदेश व गुजरात राज्य सरकारने अद्याप राज्य परिवहन महामंडळ ला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आंतरराज्य सेवा सुरू झालेली नाही. तर कर्नाटकत पंढरपूर मार्गे जाणाऱ्या काही गाड्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर सोलापूर मार्गे गाणगापूर, हुबळीला जाणाऱ्या गाड्या सीमेपर्यंतच म्हणजेच दुधनीपर्यंत जात आहे.
कोट : १
मी गाणगापूरला नेहमी जात असतो मात्र, कर्नाटक राज्य सरकारने एसटीला परवानगी न दिल्याने त्या गाड्या दुधनीपर्यंतच धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना सीमेवर उतरून कर्नाटकच्या गाडीने पुढे जावे लागते. या गाड्या कधी वेळेवर मिळतात तर, कधी नाही त्यामुळे प्रवाशांना वाट पाहत राहावे लागते. सामानासह मुलांना घेऊन दोन गाड्या बदलणे हे खूप त्रासदायक ठरते. तेव्हा कर्नाटक राज्य सरकारने परवानगी देणे गरजेचे आहे.
-विशाल धोत्रे, एसटी प्रवासी
कोट २
ज्या राज्यांनी परवानगी दिली त्या राज्यांत सेवा सुरू आहे. अन्य राज्याशी देखील संपर्कात आहोत. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर त्याठिकाणी देखील प्रवासी गाड्या सुरू केल्या जातील.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे