राज्यात पोलीस भरती कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:32+5:302020-12-23T04:08:32+5:30
अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले ...
अमोल अवचिते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण व शहरी भागातील लाखो तरुण पोलीस भरतीची आस लावून बसले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने तरुणांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिस भरती कधी होणार असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
राज्यात पहिल्यांदाच १२ हजार ५२८ पदांची मोठी पोलीस भरती करणार, या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अडसर येणार नाही आदी घोषणा राज्य सरकारने केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या दिशेने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
कोरोनाची साथ आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील, आदिवासी पट्यातील, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस होण्याचे ध्येय ठेऊन अनेक युवक-युवती तयारी सुरू करतात.
मात्र राज्य शासनाच्या ढिलाईमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. यात हजारो तरुण-तरुणींची ऐन उमेदीची वर्षे वाया चालली आहेत. तीन वर्षे भरती झाली नसल्याने अनेकांची वयोमर्यादा ओलांडली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांनी न्याय कोणाकडे मागावा, राजकारणामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावते आहे या प्रश्नांंमध्ये विद्यार्थी गुरफटले आहेत. पोलीस भरती तीन वर्षे रखडल्याने आर्थिक, मानसिक प्रश्न निर्माण होत असल्याची खंत किरण गवळी, गणेश काशीद, संतोष खताळ, कौतुभ जगताप, कृष्णा काते, सचिन शिंदे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
चौकट
काय झाले गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचे?
“पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार. पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल,” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख मे २०२० मध्ये दिले होते.
चौकट
सरकार याची उत्तरे देईल का?
- परीक्षा कधी होणार?
- लेखी परीक्षा? आधी होणार की मैदान चाचणी परीक्षा?
- लेखी परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?
- सरकारी दिरंगाईमुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार?
- ऑनलाईन परीक्षेत भ्रष्टाचार झाला तर जबाबदारी कोणाची ?