लसीकरणाचा वेग कधी वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:55+5:302021-02-20T04:26:55+5:30

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरणाची गती वाढवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अजूनही लसीकरणात सरासरी ...

When will the rate of vaccination increase? | लसीकरणाचा वेग कधी वाढणार?

लसीकरणाचा वेग कधी वाढणार?

Next

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे. अशा स्थितीत लसीकरणाची गती वाढवणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अजूनही लसीकरणात सरासरी ५२ ते ५५ टक्के उद्दिष्ट गाठण्यात यश मिळत आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सध्या सुरू असलेल्या लसीकरणाची गती गृहीत धरल्यास सर्वांना लस मिळण्यासाठी किती दिवस लागतील, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. लसीकरणाची ही गती कायम राहिल्यास सामान्य माणसाला पुढील वर्षीच लस मिळेल की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातच होत असल्याने डोस उपलब्ध होण्याबाबत कोणतीही अडचण नाही. असे असतानाही लसीकरणातील उदासीनतेबाबत आरोग्य यंत्रणेकडे कोणतेही उत्तर नाही.

लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ५०-५५ टक्केच लसीकरण होत आहे. को-विनअ‍ॅपमधील गोंधळामुळे लसीकरणाचा टक्का कमी होत असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. खासगी डॉक्टरांची नावेच को-विन अ‍ॅपवरून गायब झाली आहेत. त्यामुळे लसीकरण करताना शासन सरकारी आरोग्य कर्मचारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये दुजाभाव करत असल्याचे खासगी डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या लसीकरणानंतर पुढील टप्प्यामध्ये ५० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. मात्र, हा टप्पा कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.

----------------------------------------------------

पॉईंटर्स

जिल्ह्यात रोज किती जणांना लस दिली जातेय : ३०००-३५००

आतापर्यंत झालेले लसीकरण :

आरोग्य कर्मचारी (पहिला डोस) - ६१,१३३

आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) - ११६२

अत्यावश्यक कर्मचारी (पहिला डोस) - ८०१२

----------------------------------------------------

लसीकरण दैनंदिन आकडेवारी (१७ फेब्रुवारीनुसार)

विभाग केंद्रेउद्दिष्ट आरोग्य कर्मचारीअत्यावश्यक कर्मचारी एकूण टक्केवारीआरोग्य कर्मचारी

(पहिला डोस) (दुसरा डोस)

पुणे ग्रामीण ४४ ४४०० ४५० १७९३ २२४३ ५१ २४०

पुणे शहर २९ २९०० ७३८ ३५५ १०९३ ३८ १०९

पिंपरी-चिंचवड८ १६०० १३३ ४५८ ५९१ ३७ ११९

------------------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण ८१ ८९०० १३२१ २६०६ ३९२७ ४४ ४६८

--------------------------------------

दहा दिवसांत २७४६ रुग्ण

गेल्या दहा दिवसांत पुणे शहरात २७४६ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ४२८ रुग्ण १७ फेब्रुवारी रोजी आढळून आले. गेल्या दहा दिवसांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर गेला आहे. रुग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------------

दररोज लसींच्या डोसचा पुरेसा पुरवठा होत आहे. लसीकरणाचा वेगही हळूहळू वाढत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय

Web Title: When will the rate of vaccination increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.