सरस्वतीच्या शृंखला कधी गळून पडणार?
By admin | Published: January 25, 2016 01:00 AM2016-01-25T01:00:45+5:302016-01-25T01:00:45+5:30
देशाला विकसित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वायत्तता अभावानेच दिसून येते.
पुणे : देशाला विकसित करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वायत्तता अभावानेच दिसून येते. शिक्षण पद्धतीतील लायसन्स, परमिटराज दूर झाल्याशिवाय हे साध्य होईल, असे वाटत नाही. देश स्वतंत्र झाला त्याप्रमाणे सरस्वतीच्या शृंखला कधी गळून पडणार, असा प्रश्न सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी उपस्थित केला.
गोगटे फाउंडेशनचे संस्थापक रावसाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या रावसाहेब गोगटे गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. मुजुमदार बोलत होते. डॉ. मुजुमदार यांच्यासह फ्रिशमन प्रभू, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर प्रभू, चितळे बंधूंचे श्रीकृष्ण चितळे, डॉ. वैजयंती खानविलकर, टीबीके कंपनीचे संचालक माधव किर्लोस्कर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ क्रीडापटू, उद्योजक माधवराव आपटे यांच्या हस्ते रविवारी झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद गोगटे, मुख्य समन्वयक ज्योती गोगटे, विश्वस्त माधव गोगटे व्यासपीठावर होते.
हा गुणवत्तेचा सन्मान असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
अध्यक्षीय पदावरून बोलताना माधवराव आपटे यांनी रावसाहेब गोगटे यांच्या कार्याचा गौरव करून सर्व क्षेत्रांत यशाचे शिखर गाठले तरी त्यांचे पाय जमिनीवर होते, असे सांगितले. माणूस म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्यांचीच पहिली अभिनंदनाची तार आल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू, चितळे, खानविलकर, किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
अरविंद गोगटे यांनी प्रास्ताविकात पुरस्कार वितरणामागील भूमिका विशद करून पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. डॉ. ज्योती गोगटे यांनी मानपत्राचे वाचन केले. माधव गोगटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)