पुण्यात पक्षी,प्राणी तपासणी अत्याधुनिक प्रयोगशाळा कधी होणार? निधीअभावी प्रस्ताव प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 04:26 PM2021-01-16T16:26:58+5:302021-01-16T16:28:55+5:30
निधीअभावी प्रलंबित : ७० कोटी रूपयांची लागते इमारत
राजू इनामदार-
पुणे: मृत पक्षी व प्राण्यांच्या तपासणीसाठी अत्यावश्यक असलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा पुण्यात बांधण्याचा प्रस्ताव निधीअभावी सरकारकडे प्रलंबित आहे. सध्या बर्ड फ्लू चा आजार पक्ष्यांमध्ये वेगाने फैलावत असल्याने अशा प्रयोगशाळेची निकड भासू लागली असून पशूसंवर्धन विभागाकडून याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
इमारतीसाठी ७० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. सरकारने या प्रयोगशाळेला मंजूरी दिली आहे, मात्र निधीची तरतुद केलेली नाही, त्यामुळे मंजूर होऊनही हा प्रस्ताव पुढे जायला तयार नाही. राज्याच्या पशूसंवर्धन विभागानेच हा प्रस्ताव सरकारला दिला होता. पक्षी व प्राणी एखाद्या साथीच्या आजाराने अचानक मोठ्या संख्येने दगावू लागले की त्यांच्या मृत शरीराची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते. साथीचा आजार असेल तर तो नव्याने अन्य पक्ष्यांमध्ये फैलावू नये तसेच मानवाला त्याचा धोका उत्पन्न होऊ नये यासाठी अशी तपासणी आवश्यक असते. सध्या देशात अशी एकमेव प्रयोगशाळा भोपाळमध्ये आहे.
एकच प्रयोगशाळा असल्याने नमुने तपासणीसाठी वेळ लागून त्याचे निष्कर्ष त्वरीत मिळत नाहीत, त्यामुळे नव्या प्रयोगशाळा गरजेचे वाटल्याने राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने हा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. या प्रयोगशाळेचे ४ स्तर आहेत. ( बीएसएल, बायो सेफ्टी लेवल,जैव सुरक्षा स्तर) त्यातील पहिल्या दोन स्तराच्या प्रयोगशाळा देशात आणखी चार राज्यांमध्ये सुरू करण्यात आल्या. त्यात पशूसंवर्धन विभागाच्या पुणे मुख्यालयातील प्रयोगशाळेचा समावेश आहे.
मात्र वर्षभरापुर्वी राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने तिसºया स्तरावरची प्रयोगशाळा पुण्यात सुरू करावी असा प्रस्ताव राज्याला दिला होता. त्याला मंजूरी मिळाली, मात्र तो निधीच्या फेºयात अडकला आहे. आता राज्यात बर्ड फ्लू चा फैलाव होत असल्याने तपासणीचे निष्कर्ष त्वरीत मिळावेत यासाठी अशी प्रयोगशाळा राज्यातही असणे अत्यावश्यक असल्याचे पशूसंवर्धन अधिकाºयांचे मत आहे.
पशूसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले की चौथ्या स्तरावरची प्रयोगशाळा भोपाळमध्येच असेल. तिथे मृत पक्षी, प्राणी यांचे शवविच्छेदन करून तपासणी केली जाते, मात्र तिसऱ्या स्तरापर्यंतच्या तपासणीमधून त्वरेने काही माहिती मिळते व त्यापासून काळजी घेणे, साथ नियंत्रणात आणणे लगेच करता येते. त्यासाठीच अशा प्रयोगशाळेची गरज आहे.
-----------
पाठपुरावा सुरू आहे.
आमच्या विभागाच्या वतीने आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आयुक्त कार्यालयात या प्रयोगशाळेसाठी जागा असल्याने जागेची अडचण नसल्याचे राज्य सरकारला कळवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सचिंद्र प्रताप सिंग, आयुक्त, पशूसंवर्धन विभाग.