सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:32 IST2024-12-23T17:31:29+5:302024-12-23T17:32:16+5:30
- डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना धक्के खात करावा लागतो प्रवास

सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार?
पुणे : पुणे-मुंबईदरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे; परंतु सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथील प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ चे विस्तारीकरण करण्यात आले. यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या गाड्यांचे डबे वाढविण्यात येणार होते; परंतु काम पूर्ण होऊनही डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मात्र अजून झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
पुणे-मुंबईदरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात; परंतु सध्या या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख गाड्यांना १६ डबे आहेत. तुलनेत प्रवासी संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे. परिणामी वादाचे प्रसंग घडत आहेत. या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या २४ करणे गरजेचे आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईतील फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यामुळे या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला; परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे त्या गाड्यांमध्ये धक्के खात प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
वादावादीचे प्रसंग टाळतील...
सकाळच्या सत्रात नोकरी व कामानिमित्त दैनंदिन ये-जा करणारे प्रवासी पास काढून प्रवास करतात. त्यामुळे त्यांची जागा राखीव असते; परंतु या डब्यांमध्ये एकादा नवीन प्रवासी बसला आणि पासधारक आले तर जागेवरून उठावे लागते. अशा वेळी वादावादी होतात. काही वेळा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये हाणामारीदेखील झाली आहे. रेल्वेला कायम गर्दी असते. त्यामुळे वादावादीचे प्रसंग टाळायचे असतील, तर प्रशासनाला रेल्वे गाड्यांचे डबे वाढविणे गरजेचे आहे.
रेल्वे प्रशासन म्हणते...
सध्या पुण्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्यात येत आहेत. झेलम एक्स्प्रेस व इतर दोन-तीन प्रमुख गाड्यांचे डबे बदलून वाढविण्यात आले आहे, तसेच एलएचबी कोच लावण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांत पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे डबेदेखील क्रमशः वाढविण्यात येतील.
एसटी आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रमुख गाड्यांचे डबे १६ वरून २४ करावेत, अशी आमची मागणी आहे; परंतु रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - हर्षा शहा