लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल
By श्रीकिशन काळे | Published: October 9, 2023 06:28 PM2023-10-09T18:28:55+5:302023-10-09T18:29:30+5:30
लघुपटाला आपल्याकडे मानाचे स्थान नसल्याने वाईट वाटते
पुणे: लघुपट हा देखील चित्रपट क्षेत्राचाच भाग आहे. परंतु, आजही लघुपटाला मुख्य प्रवाहामध्ये जागा दिलेली नाही. परदेशात या कलेवर त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात. पण भारतात ते होत नाही. लघुपट निर्मात्यांचा सन्मान व्हायला हवा. त्यांना पाठबळ मिळायला हवे, अशी अपेक्षा प्रसिध्द दिग्दर्शक लेखक, लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांनी व्यक्त केली.
आशय फिल्म क्लब आणि अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात (एनएफआय) आयोजित तीन दिवसीय 'मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा'चे उद्घाटन सोमवारी सकाळी कुंडलकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलते होते. यावेळी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे (पश्चिम विभाग) उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव, महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक जय भोसले आणि व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर उपस्थित होते. या महोत्सवात जगभरातील ४१ देशातील दर्जेदार लघुपट पहायला मिळत आहेत. जस्ती गुहान दिग्दर्शित 'डेकोईट' या लघुपटाने महोत्सवाला सुरवात झाली. सर्वांसाठी हा महोत्सव विनामुल्य खुला असून, १० व ११ ऑक्टोबरला देखील पाहता येईल.
कुंडलकर म्हणाले, मी तसा लेखक असून, केवळ कादंबरी लिहून इथे जगू शकत नाही. त्यामुळे मला जगण्यासाठी इतर पर्याय स्वीकारावे लागले आहेत. मी लघुपट तयार करत गेलो आणि माझे चित्रपटाविषयीचे 'थिऑटीकल ग्रामर' लघुपटामुळे पक्के झाले आहे. पण या लघुपटाला आपल्याकडे मानाचे स्थान नाही. त्यामुळे वाईट वाटते.’’
वीरेंद्र चित्राव म्हणाले की, लघुपट हा जाणीवा समृध्द करणारे माध्यम आहे. चित्रपटाइतके त्याला महत्त्व दिले जात नाही. ही खंत आहेच. आता २१ व्या शतकात दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव लक्षात घेता लघुपट आणि अनुभवपटातून तरूणवर्ग व्यक्त होऊ लागला आहे. तीन तासांचे चित्रपट आज तीन मिनिटांमध्ये मांडले जाते. हे कौतुकास्पद आहे.
आर्थिक पाठबळासाठी प्रयत्न
आम्ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत असून, लघुपट निर्मात्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी पाठपुरावा करीत आहोत, असे वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.
लघुपटांचा आनंद लुटता येणार
११ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. महोत्सवात युके, फ्रान्स, इटली, कॅनडा, मेक्सिको, स्विझर्लंड, स्पेन, ग्रीस, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युक्रेन अशा जगभरातील ४१ देशातील तसेच भारतातील दर्जेदार लघुपटांचा अस्सल खजिन्याचा आनंद लुटता येणार आहे.