ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 05:41 AM2024-03-01T05:41:27+5:302024-03-01T05:42:18+5:30

पुण्यातील कुरकुंभप्रकरणी पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद

Where and how many people sold the drug formula? | ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला?

ड्रग्ज निर्मितीचा फॉर्म्युला कुठे अन् किती जणांना विकला?

लोकमत न्यूज नेटवर्क  
पुणे : कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरी प्रा. लि. कंपनीचा मालक भीमाजी साबळे आणि युवराज भुजबळ हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह देशात इतर किती ठिकाणी व किती व्यक्तींना ‘एमडी’ हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला विकला, याचा तपास करण्यासाठी आराेपींची पाेलिस काेठडी वाढवण्याची विनंती तपास अधिकारी शब्बीर सय्यद यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी साबळे आणि भुजबळ यांना ४ मार्चपर्यंत, तर पश्चिम बंगालहून नव्याने अटक केलेल्या सुनील बर्मन या आरोपीला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करून आतापर्यंत दिल्ली, सांगली आणि पुणे येथे छापा टाकून  ३६०० कोटी रुपयांचे १८३७ किलोग्रॅम ‘एमडी’ जप्त केले आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आरोपी  सुनील बर्मन याच्यासह एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बर्मन याला बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यातील भीमाजी परशुराम साबळे आणि युवराज बब्रुवान भुजबळ यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्यासह आरोपी बर्मन यालाही गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक आरोपींना समोरासमोर तपास करून व्यवसायाकरिता कुणी अर्थसाह्य केले. 

आरोपींनी अमली पदार्थांतून मिळालेले पैसे कोणत्या कारणासाठी वापरले, त्याबाबत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन तपास करायचा आहे. त्यासाठी भुजबळ व साबळे यांची पोलिस  कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली; मात्र आरोपींचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी भुजबळ आणि साबळे यांच्या पोलिस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने दोघांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची 
वाढ केली.

Web Title: Where and how many people sold the drug formula?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.