सम्राट अशोकाचा मृत्यू कुठे आणि कशामुळे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:27+5:302020-12-25T04:10:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर दोनशे वर्षांनी जन्माला आलेल्या सम्राट अशोकाने बुद्ध धर्माचा युरोपपर्यंत विस्तार केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर दोनशे वर्षांनी जन्माला आलेल्या सम्राट अशोकाने बुद्ध धर्माचा युरोपपर्यंत विस्तार केला. मात्र या महान सम्राटाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, कुठे झाला याबद्दलच्या विश्वासार्ह पुराव्यांवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सम्राट अशोकाच्या मृत्यूचा शोध घेणारी संशोधन समिती नेमावी,” अशी मागणी बुद्धगया (बिहार) येथील बौद्ध अवशेष बचाव अभियानाचे भंते तिस्सावोरो यांनी केली.
सहाव्या शतकातल्या सम्राट अशोकाचे साम्राज्य तत्कालीन हिंदुस्थानापासून पश्चिमेकडील पँलेस्टाईन प्रांतापर्यंत पसरले होते. त्याच्यात कार्यकाळात बौद्ध धर्माचा वेगाने प्रसार झाला. मात्र एवढा महान राजा असूनही त्याच्या जीवनपटाबद्दलची पुरेशी माहिती उजेडात आलेली नाही. सम्राट अशोकाच्या संदर्भातले पाली भाषेत उपलब्ध असणारा सर्व तपशील केंद्राकडे सुपूर्त केला आहे. देशात शेकडो ठिकाणी उत्खनन चालू आहे. या सर्वांच्या आधारे सम्राट अशोकाच्या इतिहासावर प्रकाश टाकला पाहिजे, असे भंते तिस्सावोरो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भंते तिस्सावोरो म्हणाले, “सम्राट असला तरी अशोक पिताही होता. त्याचा पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत होते. या दोघांना भेटण्यासाठी सम्राट अशोकाने तीनदा दक्षिण भारताचा प्रवास केला. मात्र तो एकदाही समुद्र ओलांडू शकला नाही. दक्षिणेकडून उत्तरेकडे परतत असतानाच सम्राट अशोकाचा मृत्यू झाला असावा. सम्राट अशोकाच्या दक्षिणेतील या प्रवासाचा नकाशा मी केंद्राकडे सादर केला आहे.” सम्राट अशोकाचा मृत्यू नेमका झाला कशामुळे? विषबाधा, युद्धातील जखमा की अन्य काही? उपलब्ध साहित्यावरुन हा मृत्यू नैसर्गिकच असावा, असे भंते तिस्सावोरो यांनी स्पष्ट केले.
चौकट
‘सन्नती’ हेच सम्राट अशोकाचे मृत्यूस्थान?
“भीमा नदीच्या तीरी कर्नाटकात कलबुर्गी (जुना गुलबर्गा) आणि यादगिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर ‘सन्नती’ हे स्थळ आहे. या ठिकाणी साडेतीन दशकांपुर्वी सम्राट अशोकाची देशातली एकमेव मूर्ती सापडली. सम्राट अशोकाने बांधलेल्या ८४ हजार स्तूपांपैकी सुमारे तीन हजार स्तूपांचा शोध मी आजवर घेतला. पाली भाषेतले साहित्य वाचून काढले. या सर्वावरुन सन्नती याच ठिकाणी सम्राट अशोकाचा शेवट झाला असावा असा कयास आहे. सन्नती येथे आजही भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत उत्खनन चालू आहे.”
- भंते तिस्सावोरो
फोटो ओळ - “सन्नती येथे सापडलेले सम्राट अशोकाचे हे देशातील एकमेव शिल्प आहे. या शिल्पावर पाली भाषेत मजकूर असून त्याचा अर्थ ‘राजा अशोक आणि पत्नी तिक्षरक्षिका’ असा आहे,” अशी माहिती भंते तिस्सावोरो यांनी दिली.