अकरावीचे २३ हजार विद्यार्थी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:55+5:302021-08-26T04:14:55+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालाने यंदा सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, सर्वाधिक ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालाने यंदा सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, सर्वाधिक निकाल लागूनही अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटलेली दिसून येत आहे. मागील वर्षी सुमारे १ लाख २ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, यंदा केवळ ७८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे २३ हजार विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. केवळ शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागातूनही विद्यार्थी शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असून, सध्या केवळ ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. त्यातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात सापडले होते. त्यामुळे पुण्यात येऊन वसतिगृहात किंवा भाडेतत्त्वार खोली घेऊन राहण्याचा विचार विद्यार्थ्यांकडून केला जात नाही.
कोरोनामुळे पालक विद्यार्थ्यांना घरापासून सोडण्यास तयार नाहीत. तसेच महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच खासगी शिकवण्यांमधून मार्गदर्शन घेऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अकरावी-बारावीसाठी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी चालतो, अशी काही विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली आहे. परिणामी, घराजवळील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यास करणे विद्यार्थी पसंत करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
------------------------
सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील केवळ ७० हजार २६१ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. त्यातील ६९ हजार विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाली असून ५९ हजार विद्यार्थ्यांनीच पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदवले आहेत. त्यामुळे १ लाख ११ हजार जागांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. परिणामी, बहुतांश विद्यार्थ्यांना घराजवळील व नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
-----------------------------