‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’, नेटक-यांचा नेटका सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:35 AM2017-10-04T06:35:16+5:302017-10-04T06:35:27+5:30
नुकतेच पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर स्वस्त असताना वाढलेले पेट्रोलचे दर पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बारामती : नुकतेच पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत कच्च्या तेलाचे दर स्वस्त असताना वाढलेले पेट्रोलचे दर पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही महागाई अतिशय त्रस्त करणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर १९७१ साली संपूर्ण दिवाळीचे किराणा सामान अवघ्या ४३ रुपयांमध्ये खरेदी केलेल्या मालाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे ‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’ असा संतप्त सवालदेखील नेटकºयांनी यामधून विचारला आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाºया महागाईमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधाºयांमध्येदेखील तू-तू-मै-मै सुरू आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस या बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनालाच भिडले आहेत. त्यामुळे सर्वसमान्य नोकरदार, शेतकरी, कष्टकरी वर्गाला महिन्याचे खर्चाचे गणित जमवताना नाकीनऊ येत आहेत. त्यात ग्रामीण आणि शहरी भागातदेखील मोलमजुरीवर जगणाºयांची संख्यादेखील मोठी आहे. सणासुदीच्या काळात घरोघरी मिठाई, तसेच फराळाचे पदार्थ तयार केले जातात. या दरम्यानच महागाई वाढते, डाळींच्या किमती वाढतात, किराणा मालाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये राहत नाहीत. परिणामी पोटाला चिमटा देऊन सण साजरे करण्याची वेळ येते. महागाई कमी करण्याबाबत शासन स्तरावरून दररोज नवनव्या घोषणा होतात. मात्र त्याची फलनिष्पत्ती किती होते, हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या १९७१ मध्ये दिवाळी सणासाठी किराणामाल खरेदी केलेली एक यादी व्हायरल झाली आहे. अवघ्या ४३ रुपयांमध्ये दिवाळीची संपूर्ण खरेदी झाली आहे. २ किलो शेंगदाणे अवघ्या ९ रुपयांमध्ये तर दीड किलो डालडा ३ रुपयांना, १५ किलो गहू १४.५० रुपये, हरभरा डाळ १.२५ रुपये, तुरडाळ १.९५ रुपये, दीड किलो पोहे ९० पैसे, २ किलो साखर ४.२० रुपये, २ किलो तांदूळ २.७५ रुपये हे काही निवडक किराणा सामानाचे १९७१ सालचे असलेले दर या यादीमध्ये आहेत. या यादीबरोबरच ‘कुठे नेऊन ठेवलाय दिवाळसण आमचा?’ असा संतप्त सवालदेखील नेटकºयांनी विचारला आहे. तसेच महागाईवरून लक्ष हटवण्यासाठीच सत्ताधारी आपआपसात चिखलफेक करीत आहेत. ज्यांनी निर्णय घ्यायचा तेच आंदोलने करीत आहे. मग आम्ही आमच्या मागण्या ‘डोनाल्ड ट्रम्प’ला सांगायच्या काय?, असा मिष्किल व मार्मिक सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे.