स्मृती इराणींच्या ताफ्यावर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती; जगदीश मुळीक यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:26 PM2022-05-17T12:26:18+5:302022-05-17T12:35:07+5:30
पुण्यातील बालगंधर्व येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळाने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे
पुणे : पुण्यातील बालगंधर्व येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळाने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण केल्याने पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्या प्रकरणानंतर भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून घटनेबाबत भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मारहाण करणे हीच भाजपची संस्कृती असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. या टीकेला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आता भाजपने आपली संस्कृती दाखवली आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलता, कंठण तोडले, मारहाण केली असं रुपाली पाटील म्हणाल्या होत्या. स्मृती इराणींच्या गाडीवर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती असे म्हणत रुपाली पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एवढं नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात ही तुमची संस्कृती आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालिश पद्धतीची वक्तव्य करतात असा असा टोलाही मुळीक यांनी प्रशांत जगताप यांचं नाव घेता लगावला आहे.
करार जवाब देंगे
वैशाली नागवडे आणि महिला या स्मृती इराणी यांना निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घालून महिलांना मारहाण केली. त्यांनी आता आपली संस्कृती दाखवली आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलता, कंठण तोडले, मारहाण केली. ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी करार जवाब देंगे असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.