रसायनयुक्त सांडपाणी नक्की मुरते कोठे?; पुण्यातील कुरकुंभ येथील प्रक्रिया केंद्र महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:04 PM2017-12-28T13:04:18+5:302017-12-28T13:13:02+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील  रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

Where do chemically drained effluents?; colsed processing center since month at Kurkumbh in Pune | रसायनयुक्त सांडपाणी नक्की मुरते कोठे?; पुण्यातील कुरकुंभ येथील प्रक्रिया केंद्र महिन्यापासून बंद

रसायनयुक्त सांडपाणी नक्की मुरते कोठे?; पुण्यातील कुरकुंभ येथील प्रक्रिया केंद्र महिन्यापासून बंद

Next
ठळक मुद्देमहिनाभरापासून राजरोस सुरू आहेत येथील कारखाने येथील तरुणांनी केला पुणे-सोलापूर महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा निर्धार

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील  रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. रासायनिक प्रकल्पातील रासायनिक सांडपाण्याचे गौडबंगाल ग्रामस्थांना समजलेले नाही. अर्थपूर्ण संबंधांतून कारखाने सुरू असून पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.
कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तीमध्ये अत्यंत कडक शब्दांत प्रदूषणावर उपाययोजना झाल्याशिवाय कारखाने चालू न देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला दिलेले होते. तरीही, महिनाभरापासून येथील कारखाने राजरोस सुरू आहेत. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या लाखो घनमीटर रासायनिक सांडपाण्याचा निचरा हा कोठे केला जातो, याचा शोध घेण्याचा साधा प्रयत्नदेखील केला जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, कुरकुंभ परिसरातील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाण्याचा व प्रदूषणाला कारणीभूत असणाºया कारखान्यांचा सर्व लेखाजोखा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिनाभरात गोळा केला आहे. त्यानुसार, काही कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यापुढील कारवाई कधी करणार, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके समोर येण्याचे टाळत आहेत. तसेच, दूरध्वनीच्या माध्यमातूनदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यालादेखील प्रतिसाद देत नाहीत.
रासायनिक प्रकल्पातील कारखानदार सध्या रासायनिक सांडपाणी साठवून ठेवल्याचा बनाव करीत आहेत. झाडांना पाणी सोडण्याच्या नावाखाली सर्रास प्रदूषित पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला. ग्रामस्थांना पाहून टँकरचालकाने तातडीने टँकर कंपनीच्या गेटमध्ये वळविला. मात्र, ग्रामस्थांनी हा टँकर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात पाठविला. तत्काळ प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळविले; पण त्यांना येण्यास उशीर होणार असल्याने या पाण्यातील रासायनिक घटकांचे प्रमाण कळू शकले नाही. मात्र, या पाण्यातून अतिशय उग्र वास येत असल्याने हे पाणी घातक स्वरूपाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कुरकुंभ येथील एका मध्यम स्वरूपाच्या कारखानदारीला महिन्याला हजारो घनमीटर पाणी लागते. कुरकुंभमध्ये मोठे, मध्यम व लहान, असे मिळून ९० कारखाने आजमितीस आहेत. त्यांना किती पाणी लागत असेल? यावरून  रासायनिक सांडपाणी किती जास्त स्वरूपात बाहेर टाकले जाते, याचा अंदाज येतोे. सांडपाणी प्रक्रिया बंद तरी कारखाने कसे सुरू, हा प्रश्न सध्या ग्रामस्थांसह सर्वांनाच पडला आहे.
महामार्गावर रास्ता रोको
कुरकुंभ येथील रासायनिक प्रदूषणाच्या बाबतीत आजवर सर्वच शासकीय कार्यालयांचे दरवाजे ठोठावले, अगदी जिल्हाधिकाऱ्यांनादेखील वारंवार विनंती केली; मात्र मुजोर कारखानदार व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील पर्यावरणाच्या हानीमुळे नागरिकांना सामान्य जीवन जगणे अवघड होऊन बसले आहे. यामुळे यापुढे थेट जिल्हाधिकाऱ्यांना कळवून पुणे-सोलापूर महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा निर्धार येथील तरुणांनी केला आहे. येत्या काही दिवसांत तसे लेखी पत्र त्यांना देण्यात येईल.

 

ग्रामस्थांना चौकीदाराची भूमिका
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळाचे अधिकारी पुणे कार्याायात बसून कारभार करीत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणावर ग्रामस्थांना नजर ठेवून राहावे लागते. यामुळे ग्रामस्थच सध्या प्रदूषण मंडळाच्या ‘चौकीदारा’ची भूमिका बजावून अधिकाऱ्यांना एखाद्या घटनेची माहिती देतात. त्यानंतर कार्यवाही करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी पुण्याहून अधिकारी रवाना होतात.

साठवण क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह 
येथील मोठ्या स्वरूपातील कारखाने आपल्याकडील रासायनिक सांडपाणी नक्की कोठे साठवत आहेत, याचा काहीच तपास लागत नाही. तशा प्रकारचा कुठलाही परिस्थितिजन्य पुरावा आजवर कुठल्याच कंपनीने दिलेला नाही. झिरो डिस्चार्ज असणाऱ्या कंपन्यादेखील झाडांच्या नावाखाली पाणी उघड्यावर सोडून देतात. त्यामुळे कुठल्या आधारावर प्रदूषण मंडळाचे अधिकारी हे कारखाने चालू देत आहेत, याबाबत शंका आहे. महिनाभरापासून लाखो घनमीटर पाण्याचा वापर करून त्याचा उत्सर्जित साठा कसा साठवला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Where do chemically drained effluents?; colsed processing center since month at Kurkumbh in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.