मुलांनी खेळायचे तरी कुठे ?
By Admin | Published: May 3, 2017 02:43 AM2017-05-03T02:43:38+5:302017-05-03T02:43:38+5:30
आमच्या मुलांना खेळण्यासाठी एखादे चांगले मैदान सुचवा हो, असे विचारले तर या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी, मला अजून सापडले
कोथरूड : आमच्या मुलांना खेळण्यासाठी एखादे चांगले मैदान सुचवा हो, असे विचारले तर या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी, मला अजून सापडले नाही, तुम्हीच शोधून सांगा आम्हाला असा प्रतिप्रश्न येतो. सांस्कृतिक राजधानी, वेगाने विकसित होण्यामध्ये गिनीस बुकमध्ये नोंद झालेले उपनगर इत्यादी उपाधी अभिमानाने लावणारे कोथरूडकर मैदानाचे नाव निघाले की, मात्र मान खाली घालतात. पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कोथरूडमध्ये मैदानांची संख्या नाममात्र आहे. त्यातही हक्काने खेळता येईल अशी जागा नाही, ही वस्तुस्थिती आहे.
येथील स्थानिक नागरिक गिरीश भागवत म्हणाले की, घर म्हटले की अंगण आले. लहान मुले अंगणात रांगायची, दुडुदुडु पळायची. आता अंगणच नाही राहिले तर मैदान कुठे असणार. त्यांच्यातील ऊर्जेला व्यक्त व्हायला जागाच नसेल तर कसा होईल शारीरिक विकास?
जीत मैदान, आयडियल कॉलनी मैदान ही सोसायट्यांची तर शंकरराव मोरे विद्यालयाचे, एमआयटीचे व काही शाळांची मैदाने आहेत. रामदेव बाबांना योगशिबिर घेण्यासाठी कोथरूडमध्ये मैदान हवे होते तेव्हा योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. अखेर पेठकर साम्राज्य जवळ असलेल्या दत्त मंदिर परिसरातील रिकामी जागा साफ करून योगशिबिरापुरते मैदान बनविण्यात आले.
मुलांना खेळायला जागा नाही म्हणून चाळीतील मोकळ्या जागेत वा जेथे रिकामी जागा उपलब्ध असेल तेथे मुले खेळतात. पुरेसी जागा नसल्याने अडीअडचणीत असलेल्या जागेत मुलांना खेळावे लागते.
मुलांना व्यवस्थित खेळता यावे म्हणून ग्राऊंड लावायचे झाल्यास महिना आठशे ते नऊशे रुपये खर्च येतो, असे पालक सांगतात. मैदानाचा अभाव असल्यामुळे ज्यांनी मैदाने राखली आहेत अशांचा धंदा तेजीत आहे. मैदान उपलब्ध करता येत नसलेले पालक आपल्या मुलांना बैठे खेळ, व्हिडिओ गेम, मोबाईल गेम देण्याचा मार्ग स्वीकारतात. (वार्ताहर)
फ्री वाय-फायचे फॅड : आभासी जगात रमताहेत मुले
१ सागर खळदकरसारखे काही कार्यकर्ते मैदानी खेळांकडे मुलांनी वळावे म्हणून विशेष प्रयत्न करताना दिसतात. कबड्डी कुस्ती वा तत्सम देशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांचा कल मात्र क्रिकेटकडे जास्त आहे. दुसरीकडे फ्री-वायफायच्या फॅडमुळे असंख्य मुले मोबाईलला चिकटलेली दिसतात. मैदानी खेळापेक्षा आभासी जगातील खेळ या मुलांना जास्त प्रिय झाला आहे.
२ निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात मैदान उपलब्ध करून देणार, असे आश्वासन दिलेले असते. परंतु, ते पूर्ण करण्यात एकही राजकीय पक्ष यशस्वी झालेला दिसत नाही. शहराच्या विकास आराखड्यात मैदानांसाठी जागांचे आरक्षण दाखवले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणीच न झाल्याने कोथरूडकर चांगल्या मैदानापासून वंचित राहिले आहेत.