महिला प्रवाशांनी तक्रार करायची तरी कुठे ? रेल्वेच्या 'हेल्पलाइन'ची नाही माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:13 AM2021-09-11T04:13:08+5:302021-09-11T04:13:08+5:30
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या हेल्पलाईनबद्दल माहितीच नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासात जर समस्या ...
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या हेल्पलाईनबद्दल माहितीच नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासात जर समस्या निर्माण झाली, तर नेमकी तक्रार कुठे करायची अथवा मदत मागायची कुठे असा प्रश्न विशेषतः महिला प्रवाशांना पडला आहे. हेल्पलाईनबद्दल रेल्वेकडून जागृतीची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे स्थानकांवरील गुन्हेचे प्रमाणात वाढ झाली. विशेषतः महिला प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकावर महिला प्रवाशांची संवाद साधून किती प्रवाशांना हेल्पलाईनबद्दल माहिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेकांना अशी काही यंत्रणा असते, याची कल्पनाच नसल्याचे समजले.
रेल्वे प्रशासनाने पूर्वी तक्रारींच्या स्वरूपानुसार हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. त्यात पँट्रीच्या तक्रारीपासून ते महिला सुरक्षेविषयीपर्यंतच्या साऱ्याच प्रकारच्या तक्रारींचा समावेश होता. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वीचे सारे क्रमांक रद्द करून आता केवळ १३९ हाच क्रमांक सुरू ठेवला आहे. या क्रमांकावर प्रवाशांना सर्व प्रकारच्या तक्रारींची नोंद करता येते.
-----------------------
रेल्वेगाडीत चोरीपासून ते महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. रेल्वेने जरी हेल्पलाईन क्रमांक दिला असला तरी तो अनेकदा धावत्या गाडीत लागतच नाही. ज्यावेळी तत्काळ मदत मिळणे गरजेचे असते त्यावेळी संपर्कच होंऊ शकत नसल्याने महिला प्रवासी अडचणीत सापडतात. रेल्वेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे
कोट २
प्रवाशांना हेल्पलाईनबद्दल माहिती व्हावी याकरिता अनेकदा जनजागृतीची मोहीम राबविली. तसेच स्थानकांवर मोठे फ्लेक्स, डब्यांत स्टिकर्स, सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली. आता तर तिकिटाच्या पाठीमागेदेखील १३९ बद्दलची माहिती दिली जात आहे.
-
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे