विद्येच्या माहेरघरात एवढे ड्रग्ज येतात कुठून? ५ महिन्यांत सापडले तब्बल ७ काेटींचे अंमली पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:25 PM2023-06-01T12:25:47+5:302023-06-01T12:25:56+5:30
परराज्यातून शिक्षणासाठी आलेले तरुण, त्यात अनेकांकडे जरुरीपेक्षा अधिक पैसा हातात आल्याने ते अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळतात
विवेक भुसे
पुणे : सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि ‘आयटी’एन्सचे शहर अशी ओळख बनलेल्या पुण्यात मागील काही वर्षांत माेठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे. मागील पाच महिन्यांत सात काेटींचे अंमली पदार्थ सापडले आहेत. याशिवाय न सापडलेला आकडा किती असेल, याबाबत विचार करायलाच नकाे. यावरून एवढे ड्रग्ज शहरात येतातच कुठून, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
शिक्षणासाठी देश-परदेशातून पुण्यात येणारा तरुण वर्ग माेठा आहे. तसेच नोकरी-व्यवसायासाठी येणारा उच्चशिक्षित वर्ग आणि बांधकामाच्या कामासाठी येणारा निरक्षर अथवा अल्पशिक्षित वर्ग देखील अधिक आहे. अशा सर्वांना व्यसनाला लावण्याचे अनेक प्रलोभने वाढत गेली. त्यातूनच पुणे हे अमली पदार्थाच्या तस्करीतील एक महत्त्वाचे हब बनले, असे सांगितले जात आहे. याच वेळी दुसरीकडे अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासह पुणे शहर ड्रग्ज फ्री करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे.
गेल्या पाच महिन्यांत तब्बल सात कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मागील वर्षी देखील सहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. पंजाबप्रमाणेच काहीशी परिस्थिती पुणे व मुंबई परिसराची होऊ लागली होती. याला राेखण्यासाठी अमली पदार्थ विरोधी मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे.
कसे अडकतात विळख्यात?
महाविद्यालयाचा परिसर, उपनगर, महामार्ग, उच्चभ्रू सोसायटीचा परिसर येथे प्रामुख्याने पुणे पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून येते. परराज्यातून शिक्षणासाठी आलेले तरुण, त्यात अनेकांकडे जरुरीपेक्षा अधिक पैसा हातात आल्याने संगतीने ते अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळतात. त्यातून त्यांना व्यसन लागत जाते.
ग्राहकच बनतात विक्रेता
अनेक विक्रेते पूर्वी अमली पदार्थाचे ग्राहक होते. त्याचे व्यसन लागल्यानंतर खर्च वाढू लागला. त्यात त्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्याच्या ओळखीने ते स्वत: इतरांना अमली पदार्थ विकू लागताे. त्यातून त्यांचा खर्च निघू लागला. शिवाय एझी मनीमुळे ते स्वत: ग्राहक आणि विक्रेते बनले आहेत. त्यात अनेक महाविद्यालयीन तरुणांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत लोकांना पोलिसांनी पकडले आहे. नायजेरियन नागरिकांचाही यात मोठा हात आहे.
अधिक खोलात जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू
पुणे ड्रग्ज फ्री करण्याच्या दृष्टीने अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणाऱ्यांवर फोकस केला आहे. त्यांची माहिती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. अधिक खोलात जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून कारवाईंची संख्या वाढली आहे. सध्या केवळ विक्री करणाऱ्यांवर भर देण्यात आला आहे. एका बाजूला तरुणाईचे समुपदेशन आणि दुसरीकडे समुपदेशन अशी दोन स्तरावर लक्ष देण्यात येत आहे. -अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त
ऑनलाइन विक्रीचा वाढला धोका
यापूर्वी मॅन टू मॅन विक्री केली जात असे. आता फूड डिलिव्हरी ॲपचा वापर केला जाऊ लागला आहे. याद्वारे ड्रग्ज पुरविले जात आहे. पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सुनील थोपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर फोकस केले. त्यातून अमलीपदार्थ विक्री करण्याचा नवा मार्ग पुढे आला. त्यातूनच अमलीपदार्थाविरोधातील कारवाईत वाढ झाली आहे. यापुढील काळात हा मोठा धोका आहे.
येथून हाेताे अधिक पुरवठा?
प्रामुख्याने मुंबई, दिल्ली तसेच अन्य मोठ्या शहरातून कोकेन, चरस, एमडी असे अमली पदार्थ पुण्यात येतात. त्याचवेळी दक्षिणेतील राज्य, ओरिसा येथून गांजा मोठ्या प्रमाणावर शहरात येत असतो. गेल्या ५ महिन्यात तब्बल २५० किलो गांजा आणि १ कोटी १८ लाख रुपयांचे एलएसडी पकडण्यात आला आहे.
मुळापर्यंत जाण्यात अडथळा
अमलीपदार्थाची विक्री करणारे तपासादरम्यान ते कोणाकडून विकत घेतले हे सांगत नाहीत. तसेच मूळ विक्रेते सातत्याने आपल्या जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा येतो.