हा माज येतो कुठून? पुण्यात वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:21 IST2025-02-07T15:20:44+5:302025-02-07T15:21:09+5:30

चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला.

Where does this guy come from? Another deadly attack on a traffic policeman in Pune | हा माज येतो कुठून? पुण्यात वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला

हा माज येतो कुठून? पुण्यात वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला

- किरण शिंदे 

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यातूनही असाच प्रकार उघडकीस आला आहे. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने त्याने चक्क वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घातला. यामध्ये पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. 

अचानक झालेल्या या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करून फरार झालेल्या दुचाकी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Where does this guy come from? Another deadly attack on a traffic policeman in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.