चित्रपटगृहांचे ‘पांढरे हत्ती’ अजून कुठवर पोसायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:15+5:302021-09-23T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या दीड वर्षापासून एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत. निव्वळ ‘पांढरा हत्ती’ म्हणून पोसावी लागणारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दीड वर्षापासून एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत. निव्वळ ‘पांढरा हत्ती’ म्हणून पोसावी लागणारी ही चित्रपटगृहे अजून किती काळ सोसायची, असा सवाल एकपडदा चित्रपटगृह चालकांनी उपस्थित केला आहे. या चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाचा खर्च आता परवडेनासा झाला आहे. सध्याच्या काळात एकपडदा चित्रपटगृहांना कायमचे टाळे लावण्याची वेळ आली असून आम्हाला त्या जागी दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी. परंतु अनेक वर्षांच्या या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचे एकपडदा चित्रपटगृह चालकांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे चित्रपटगृह बंद ठेवल्याने चित्रपट व्यवसाय ठप्प झाला आहे. सर्व क्षेत्रे खुली झाली, परंतु मनोरंजनाचा पडदा अद्यापही बंदच ठेवला आहे. त्याची झळ दीड वर्षापासून एकपडदा चित्रपटगृहांना बसली आहे. ओटीटीकडे वळलेले प्रेक्षक चित्रपटगृहे खुली झाली तरी त्याकडे फिरकतील याची शाश्वती नाही. याकरिता पुणे एक्झिबिटर्स असोसिएशनने एकपडदा चित्रपटगृहांच्या जागेवर दुसरा व्यवसाय उभा करण्याची परवानगी द्यावी, असे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. त्यालाही वर्ष उलटले तरी राज्य सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.
चौकट
“चित्रपटगृह चालविणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनासाठी एका महिन्याचा खर्च एक ते दीड लाख रुपये आहे. आजही तो खर्च आम्हाला करावा लागत आहे. वीज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, अन्य कर, जागा भाडे असा खर्च होत आहे. सरकारने एकपडदा चित्रपटगृह चालकांच्या अडचणी समजून घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्ही आर्थिक अडचणीत आहोत.”
-सदानंद मोहोळ, अध्यक्ष पुणे एक्झिबिटर्स असोसिएशन
चौकट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये १९९३ मध्ये एकूण एकपडदा चित्रपटगृहे होती, त्यातील १८ चित्रपटगृहे बंद पडली. पुण्यात १५० मल्टिप्लेक्स आहेत, तर त्या तुलनेत १५ एकपडदा चित्रपटगृहे असून, त्यातील जवळजवळ सर्वच चित्रपटगृहे आर्थिक नुकसान सहन करत आहेत.