पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:48 AM2024-05-22T08:48:00+5:302024-05-22T08:49:02+5:30

या विभागाच्या गेल्या दोन ते अडीच वर्षातील सर्वाधिक कारवाया परराज्यातून अवैध पद्धतीने होणाऱ्या मद्य वाहतुकीवर झाल्याचे दिसून येते...

Where exactly is the 'Excise' department in Pune? A clear disregard for illegal businesses in the city | पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष

पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष

पुणे : शहरात रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास आलिशान चारचाकीने दोन अभियंत्यांना चिरडून ठार मारले. या घटनेची राज्यभर चर्चा होत आहे. तरीही एक्साइज विभाग झोपेतच आहे. या विभागाच्या गेल्या दोन ते अडीच वर्षातील सर्वाधिक कारवाया परराज्यातून अवैध पद्धतीने होणाऱ्या मद्य वाहतुकीवर झाल्याचे दिसून येते.

''लोकमत''ने यापूर्वीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शहरात एका पबमध्ये मद्य विक्री केली जात असल्याचे पुराव्यानिशी प्रसिद्ध केले होते. त्यासोबतच कल्याणीनगर येथील एल्रो आणि युनिकॉर्न हे पब पहाटेपर्यंत सुरू असल्याचे अनेकदा पुराव्यानिशी मांडले होते. यावरही या विभागाने कोणतीच कारवाई केली नाही, अखेर पोलिसांनी या पबवर कारवाई केली. त्यामुळे या विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत आणि त्यांची संपूर्ण टीम नेमकी करते काय? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

पब, बार अथवा दारूची दुकाने वेळेत सुरू आणि बंद होत आहे की नाहीत? अल्पवयीन मुलांना मद्य विक्री अथवा मद्य पिण्यासाठीची जागा, तर येथे उपलब्ध करून दिली जात नाही ना? हे पाहण्याचे काम या विभागाचे असते. मात्र, गेल्या वर्षभरात या विभागाने अशा पब अथवा बार चालकांवर कारवाई केल्याची नोंद नाही. यापूर्वी एकदाही एक्साइज विभागाने वेळेसंदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

वास्तव काय?

- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या पुणे विभागाने अवैध दारू विक्रेते, वाहतूक करणारे आणि व्यावसायिकांवर कारवाया केल्या. अवैध मद्य निर्मिती, मद्याची वाहतूक, विक्री तसेच परराज्यातील मद्याच्या वाहतुकीबद्दल विशेष मोहीम राबवली. मात्र, शहरातील पब, बार चालकांसाठी कोणतीही मोहीम राबवलेली नाही.

- जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात या विभागाने ४२६ गुन्हे दाखल करत ४११ जणांना अटक केली. या कारवायांमध्ये ३६ वाहनांसह दोन कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- एक्साइजच्या पुणे विभागाने २० हजार ६७५ लिटर हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी दारू, १८ हजार २९५ लिटर विदेशी दारू आणि १८२३ लिटर ताडी पकडली. मात्र, राजरोसपणे सुरू राहणारे शहरातील पब यांच्यावर कोणतीही कारवाई नाही.

- कारवाई दाखवण्यासाठी काही वाईन शॉपवर कारवाई करत ते कायमस्वरूपी बंद करणे अथवा अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यांवर कारवाई करणे अशा किरकोळ स्वरूपाच्या कारवाया केल्या गेल्या.

‘रुफटाॅप’वरील कारवाया जुजबीच :

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात ३४ रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली. यात फक्त १७ लाख रूपये दंड वसूल करत जुजबी स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या.

कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई काय? :

घटना कोणतीही असो दरवेळी पोलिस प्रशासनालाच धारेवर धरले जाते, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जाते. कल्याणीनगर प्रकरणात पोलिसांच्या वाहतूक शाखेची चूक नक्कीच आहे, मात्र एक्साईज विभागावर कुणीच बोलत नाही अथवा त्यांच्यावर आरोप केले जात नसल्याने या विभागाचे चांगलेच फावते आहे. या विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक आता काय कारवाई करतील, हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: Where exactly is the 'Excise' department in Pune? A clear disregard for illegal businesses in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.