हेल्मेटसक्तीचा नियम नेमका कुठं? नागरिक संभ्रमावस्थेत, हेमंत रासनेंनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 04:06 PM2024-11-28T16:06:02+5:302024-11-28T16:06:38+5:30
गेल्या २ दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेटसक्ती सांगण्यात येत आहे
पुणे: गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परंतु पुणे पोलिसांकडून अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नसून महामार्गांसाठी वरिष्ठस्तरावरून आदेश काढण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसून कारवाई केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.
पुणे शहरात दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालावे अन्यथा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्गांवरील दुचाकीस्वार व सहप्रवाशांसाठी हे आदेश काढण्यात आल्याचं यावेळी आयुक्तांनी सांगितलं आहे.
याविषयी बोलताना आमदार रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेट असणे गरजेचे असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे मध्यवस्तीतील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून अनेकांनी मला फोन करून विचारणा केली. याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे आदेश महामार्गांसाठी असून मध्यवस्तीतील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असतात महामार्गांवर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे.