जिथून पेटली शिक्षणाची पहिली ज्योत; तिथंच हवाय आता प्रकाशाचा झोत !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 11:00 PM2020-01-02T23:00:00+5:302020-01-02T23:00:02+5:30

सावित्रीच्या लेकींची पहिली शाळा अंधारात; 172 वर्षे पूर्ण 

From where the first flame of education burns; There is now a flicker of light! | जिथून पेटली शिक्षणाची पहिली ज्योत; तिथंच हवाय आता प्रकाशाचा झोत !

जिथून पेटली शिक्षणाची पहिली ज्योत; तिथंच हवाय आता प्रकाशाचा झोत !

Next
ठळक मुद्देज्या वाड्यात ही शाळा सुरू झाली, तिथे सध्या अंधार पसरलेला असून, तो वाडा मोडकळीसराष्ट्रीय स्मारक होण्यापासून हे शिक्षणाचे माहेरघर अजूनही वंचितच

पुणे : ज्ञानाची ज्योत लावून देशभरात शिक्षणाची गंगा नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांनी भिडेवाडा येथे देशातील पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली होती. त्याला १ जानेवारी २०२० रोजी १७२ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु दुर्देव असे की, ज्या वाड्यात ही शाळा सुरू झाली, तिथे सध्या अंधार पसरलेला असून, तो वाडा मोडकळीस आला आहे. राष्ट्रीय स्मारक होण्यापासून हे शिक्षणाचे माहेरघर अजूनही वंचितच राहिले आहे. शिक्षणाची ज्योत जिथून पेटली, तिथेच आता प्रकाशाची गरज निर्माण झाली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज (दि. ३ जानेवारी) उत्साहात सर्वत्र साजरी केली जाईल, मात्र त्यांनी पहिली मुलींची शाळा जिथे सुरू केली तो भिडेवाडा दयनीय अवस्थेत आहे. पुण्यात बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यामध्ये १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र सध्या हा वाडा मोडकळीस आला आहे. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही. या वाड्यात जायला पायºया देखील व्यवस्थित नाहीत. छत कोसळलेले असून, सर्वत्र माती, बाटल्या पडलेल्या आहेत. सगळीकडे धूळ, पडक्या भिंती आहेत. कुमट वास येत असल्याने इथे थांबणेही शक्य होत नाही.
बुधवार पेठेतील श्रीमंत  दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर असणाऱ्या या वाड्याकडे बाहेरून बघताना ही एक ऐतिहासिक वास्तू असेल असं वाटणार नाही. शहराच्या  गजबजलेल्या भागात असणारा हा वाडा कधीही पडू शकतो. वाड्याच्या दुरुस्तीचा वाद न्यायालयात पोचल्याने महापालिका प्रशासन निदान जयंतीपुरताही वाडा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत नाही. विद्येचं माहेरघर असणाºया पुण्यात मुलींना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या भिडेवाड्याची दुरवस्था लज्जास्पद आहे. या वाड्याबाहेर सुरक्षारक्षक तर लांबचं पण साधे विजेचे दिवेही नाहीत. त्यामुळे इथे अंधार पसरलेला आहे.
  भिडेवाडा दुरूस्तीसाठी पुणे महापालिकेने 2028-19 च्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपए तरतूद केली आहे. पण अद्याप या ठिकाणी काहीच झालेले दिसत नाही.
 -----------------------
भिडेवाडा दुरूस्तीसाठी निधी आहे, पण जागेचा ताबा मिळत नाहीय. कारण हे प्रकरण न्यायलयात असून, तेथील दुकानदारांनी विरोध केला आहे. त्यांच्यामुळे न्यायालयाने भूसंपादनास स्थगिती दिलेली आहे. निर्णय अजून झालेला नाही. म्हणून भिडेवाड्याची दुरूस्ती रखडली आहे. तिथे नामफलक नसेल, तर परत लावता येईल.
- हर्षिता शिंदे, अधिकारी, हेरिटेज सेल, पुणे महापालिका
-----------------------------------
ज्या ठिकाणी पहिली शाळा सुरू झाली, तो संपूर्ण भिडेवाडा संरक्षित होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत आहोत. निधी मंजूर असला तरी जागेसाठी प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. निकाल लवकर लागून हा वाडा राष्टÑीय स्मारक झाला पाहिजे. 
- नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते 
================================
ज्या ठिकाणी फुले दाम्पत्याने देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली, तो 'भिडेवाडा' संपूर्ण भारत देशाला प्रेरणा देणारा आहे. पण ते ठिकाण आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून खूप दयनीय अवस्थेत आहे.आम्ही पुणेकर देशाला व पुढच्या पिढीला 'ऐतिहासिक भिडेवाडा' म्हणून काय दाखवणार.? हा प्रश्न प्रशासनाला व आपणा सर्वांना पडला पाहिजे आणि भिडेवाड्याचे 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून संवर्धन झाले पाहिजे.
- जगदीश ओहोळ
(व्याख्याते व इतिहास अभ्यासक)
==========================

Web Title: From where the first flame of education burns; There is now a flicker of light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.