पादचारी वाऱ्यावर : सांग, पदपथ म्हणजे काय रे भाऊ..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:49 AM2018-06-15T02:49:53+5:302018-06-15T02:49:53+5:30
शहरातील काही रस्त्यांवर अस्तित्वात असलेल्या पदपथांची झालेली दुरवस्था आणि अनेक रस्ते पदपथाविनाच असल्याने बारामतीकरांवर ‘पदपथ म्हणजे काय रे भाऊ?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही पदपथांवर एक प्रकारे पादचाºयांची नाकाबंदीच करण्यात आल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील राजा असलेला पादचारीच सुविधांपासून वंचित असून त्याची ससेहोलपट होताना दिसत आहे.
बारामती - शहरातील काही रस्त्यांवर अस्तित्वात असलेल्या पदपथांची झालेली दुरवस्था आणि अनेक रस्ते पदपथाविनाच असल्याने बारामतीकरांवर ‘पदपथ म्हणजे काय रे भाऊ?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही पदपथांवर एक प्रकारे पादचाºयांची नाकाबंदीच करण्यात आल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील राजा असलेला पादचारीच सुविधांपासून वंचित असून त्याची ससेहोलपट होताना दिसत आहे.
मागील काही वर्षांत बारामती शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. संपूर्ण देशभरात विकासाच्या बाबतीत तालुका पातळीवर ‘पॉवरफुल बारामती’ असा लौकिक आहे. पण येथील सोयी-सुविधांचा आढावा घेतल्यास त्यातील फोलपणा समोर आला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील पदपथ व पादचाºयांना भेडसावणाºया समस्यांची पाहणी केली.
शहरातील काही मोजके रस्ते सोडल्यास बहुतेक रस्ते पदपथांविनाच असल्याचे दिसून आले. संपूर्ण रिंगरोड, भिगवण चौक ते पेन्सिल चौक, सिनेमा रस्ता, कसबा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह यांसह अन्य काही रस्त्यांवर पदपथ अस्तित्वात आहेत. मात्र, यातील बहुतेक पदपथांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पदपथ उखडले असून काही ठिकाणी मोठ्या झाडांनी पदपथ अडविला आहे.
तसेच महावितरणचे बॉक्स, दुकानदारांच्या पाट्या, विविध माहितीफलक, बांधकामाचे साहित्य, दुकानातील वस्तु, पार्किंग केलेली वाहने, फेरीवाले यांमुळे पदपथांची जणू नाकाबंदी करण्यात आली आहे.
एसटी बसस्थानकालगत असलेल्या मुख्य इंदापूर रस्त्यावर दररोज मोठी वर्दळ असते. बाहेरगावाहून येणारे नागरिक मंडईसह पेठांमध्ये खरेदीसाठी येत असतात. पण या रस्त्यावरील संपूर्ण पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकला आहे.
रिंगरोडवरही ठिकठिकाणी दुकानांमधील साहित्य, गॅरेज थाटण्यात आली आहेत. काही ठिकाणी तर घरांमधील सामानही पदपथांवर ठेवण्यात आले आहे.
तुलनेने सिनेमा रोड यातून सुटलेला दिसतो. या रस्त्यावर काही ठिकाणी दुकानदारांच्या पाट्या व एखाद्या विक्रेत्याची गाडी दिसून आली. काही ठिकाणी दुचाकी लावण्यात आल्या होत्या.
भिगवण रस्त्यावरील पदपथही काहीसा मोकळा श्वास घेत असल्याचे पाहायला मिळाले. नगरपालिकेसमोरील पदपथ असून नसल्यासारखा आहे. त्यालगतच खाजगी वाहने उभी राहत असल्याने पादचाºयांना त्याचा उपयोगच होत नाही.
खरं तर रस्त्यावर पहिला अधिकार कोणाचा तर तो निश्चितच पादचाºयांचा. त्यानंतर वाहनचालकांचा. मात्र, हा पादचारीच एकूण ‘इनफ्रास्ट्रक्चर’मधून गायब झालेला आहे. रस्त्यांची रचना करताना पदपथांचा गांभिर्याने विचारच केला जात नाही. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºया नागरिकांमध्ये पादचाºयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पादचारी सुरक्षेच्या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने पदपथ बनविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दुरदृष्टी ठेवून नियोजन करण्याची जबाबदारी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवरही आहे.
पदपथच नाहीत
शहरातील एसटी बसस्थानक व गणेश मंडईसमोरील रस्ता आणि सिनेमा रस्त्यासह शहरातील महावीर पथ व स्टेशन रस्ता सर्वाधिक वर्दळीचा असतो. मात्र, या दोन्ही रस्त्यांवर पदपथच अस्तित्वात नाहीत.
या रस्त्यांसह शहरातील अनेक रस्ते पदपथांविनाच असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यातच सर्वच रस्त्यांवर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यांवर नागरिकांना चालण्यासाठीही कसरत करावी लागते.
मागून वाजणारे हॉर्न आणि गर्दीतूनही वेगात वाहने दामटणाºया चालकांचा त्रास सहन करावा लागत आहे.
पादचारी रस्त्यावर
४पदपथांवर ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने पादचाºयांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच पदपथांसमोर दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात आल्याने नागरिकांना रस्त्याच्या मध्यापर्यंत यावे लागत आहे.
परिणामी, काही ठिकाणी वाहतूककोंडी होते. जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याच्या भावना काही नागरिकांनी
व्यक्त केल्या.
पथारी व्यावसायिकांचे भिजत घोंगडे
काही भागातील पदपथांवर अनेक वर्षांपासून पथारी व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी काही वर्षांपासून होत आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास इंदापूर रस्त्यावरील पदपथ मोकळा श्वास घेतील. पण नगरपालिका प्रशासन अद्याप त्यावर तोडगा काढू शकले नाही.