कुटुंबासह जायचे कुठे?; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:35 AM2018-12-12T03:35:41+5:302018-12-12T03:35:56+5:30
शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या कारवाईविरोधात तेथील नागरिकांमध्ये रोष वाढू लागला आहे. अन्यत्र कमी भाडे देऊन घर मिळत नाही. मुलांच्या शाळा, छोटे-छोटे व्यवसाय, मुजरीची कामे सोडून कुटुंबासह जायचे कुठे? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील १५९ घरे व २७ दुकाने रिकामी करून सोडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. याबाबतच्या नोटिसा सर्व रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी हतबल झाले आहेत. अनेक जण वर्षानुवर्षे या जागेवर राहत आहेत. अनेकांचे छोटे व्यवसाय, दुकानेही याच परिसरात आहेत. मजुरी, घरकाम करणारे अनेक जण आहे. त्यावरच संसाराचा गाडा हाकला जातो. मुलांच्या शाळाही याच परिसरात आहेत. त्यामुळे अचानक सर्व सोडून इतरत्र राहायची व्यवस्था कशी होणार? व्यवसाय, मुलांच्या शाळा बंद पडतील. त्यामुळे इथेच राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
नागरिकांनी मांडली आमदारांसमोर व्यथा
आमदार अनिल भोसले यांनी दुपारी परिसरातील नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. नवीन नियमाप्रमाणे झोपडट्टीवासीयांना आहे तिथेच, त्याच जागी घर देणे आवश्यक आहे. यापूर्वी आम्ही झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी औंधमध्ये घर देण्याची मागणी केली होती. पण ती मागणी त्यावेळेस फेटाळली गेली. आता या रहिवाशांना आहे त्या ठिकाणीच घर पाहिजे, असे भोसले यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून येथेच राहतोय. आता अचानक घर खाली करावे लागले तर कोठे जायचे, हा प्रश्न पडलाय. दुसरीकडे गेल्यावर परत कामाचा प्रश्न. स्थानकाबाहेरच माझा व्यवसाय आहे.
- अनिल मोरे, रहिवासी
आठ दिवसांपासून घर शोधतोय, पण घर मिळत नाही. दुसरीकडे गेलो तर आताच काम पण जाईल मग पुन्हा नवीन काम शोधावे लागेल. शासनाने आम्हाला पाच महिन्यांची मुदत द्यावी. मे महिन्यात मुलांच्या परीक्षा होईपर्यंत तरी आम्हाला येथे राहू द्यावे.
- अर्चना कोळी, रहिवासी
माझी एक मुलगी बारावीला आणि दुसरी पदवीचे शिक्षण घेतेय. इथून गेलो तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. हडपसरला यांनी घरे दिली पण काही कारणांमुळे ती विकावी लागली. पोलीस बंदोबस्तात घर पडणार आहेत. आधी आमच्यावरूनच बुलडोझर घाला म्हणजे आमचे प्रश्न तरी संपतील.
- मंगल बकरे, रहिवासी