PMC: पालिकेचा आरोग्य विभाग आहे कुठे? पुणेकर साथीच्या आजाराने त्रस्त; मनसेचे आंदोलन
By निलेश राऊत | Published: August 7, 2023 07:18 PM2023-08-07T19:18:01+5:302023-08-07T19:20:01+5:30
महापालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर तातडीने उपचार करावेत आणि साथीचे आजार आटोक्यात आणावेत...
पुणे : शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पुणे शहरातील अनेक नागरिक आजारी असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर तातडीने उपचार करावेत आणि साथीचे आजार आटोक्यात आणावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी आंदोलनानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले. बाबर म्हणाले, पावसाळी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येतात; परंतु यावर्षी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही काळजी घेतली नसल्याने साथीचे आजार वाढत आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी, पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात डासाची पैदास होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत आहेत. डासांमुळे शहरात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया, थंडी-ताप आदी आजार वाढत आहेत. डोळ्यांचे आजार, डोळे येणे अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरू झाल्याचे आढळून येत आहे. पुणे शहरातील सर्व रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी, पुणेकर नागरिक डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी याची सर्वच स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या अनेक रुग्णालयामध्ये सेवाभावी संस्थांकडून डायलेसीस मशीन, एक्स-रे मशीन इतर आरोग्य तपासण्या करण्यासाठी मशीन देण्यात आलेल्या होत्या; परंतु तपासण्या करणाऱ्या अनेक मशीन बंद असल्याने तपासण्या होत नसल्याने योग्य उपचार मिळत नाहीत त्यामुळे गोर-गरीब जनतेचे दररोज हाल होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आले.