जेधे फाउंडेशनच्या वतीने कोविड अन्नसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:44+5:302021-05-13T04:09:44+5:30
केडगाव : केडगाव व पारगावच्या कोविड केअर सेंटर ठिकाणी कोविड रुग्णांना आणि अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज नाश्ता व ...
केडगाव : केडगाव व पारगावच्या कोविड केअर सेंटर ठिकाणी कोविड रुग्णांना आणि अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज नाश्ता व दुपारचे जेवण अशी अन्नसेवा देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनतर्फे देण्यात येत आहे. पारगाव येथील जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. नाश्त्यामध्ये दूध, अंडी, बिस्किटे यांचा समावेश असतो. तर दुपारचे पोटभर जेवण या फाउंडेशनच्यावतीने दिले जाते. दररोज परिसरातील ७९ रुग्ण व स्वयंसेवक या सुविधेचा लाभ घेत आहेत. गेली १५ दिवसांपासून ही सुविधा चालू झाली आहे.
विशेष म्हणजे, भोजनाची पार्सल्स रुग्ण व कर्मचारी यांना वेळेवर मिळावीत यासाठी पारगाव मोबाईल शॅापी असोसिएशनने उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे. भोजन पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी मोबाईल शॅापी दुकानदारांनी आपापसात आळीपाळीने वाटून घेतली आहे.
या कामी प्रकाश गोलांडे (पारगाव) व प्रशांत मुथा (केडगाव) या मित्रांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले. यासंदर्भात दिग्विजय जेधे म्हणाले की, संकटाच्या काळात समाजातील सारे लोक आपोआप एकत्र येतात. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवाकार्य करतात. ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे. चला, आपण सारे असेच एकजूट होऊन परस्परांना धीर देऊ. अंधार वाढला आहे. आपण सेवेची आशेची एक ज्योत प्रज्वलित करू.
केडगाव येथे रुग्णांना नाश्ताची सोय करताना अध्यक्ष दिग्विजय जेधे व मान्यवर.